मोना सिंगसोबत सीन, वरळीत शूटिंग अन् पोलिसाची भूमिका; 'मिस्ट्री'निमित्त क्षितीश दातेचा पहिल्या हिंदी वेबसीरिजचा अनुभव

By देवेंद्र जाधव | Updated: July 22, 2025 12:24 IST2025-07-22T12:23:59+5:302025-07-22T12:24:48+5:30

मिस्ट्री या वेबसीरिजमध्ये क्षितीश दाते झळकत आहे. यानिमित्ताने क्षितीश पहिल्यांदाच हिंदी वेबसीरिजमध्ये काम करतोय. या वेबसीरिजच्या शूटिंगचा अनुभव क्षितीशने शेअर केलाय

kshitish date talk about mistry webseries experience with mona singh ram kapoor | मोना सिंगसोबत सीन, वरळीत शूटिंग अन् पोलिसाची भूमिका; 'मिस्ट्री'निमित्त क्षितीश दातेचा पहिल्या हिंदी वेबसीरिजचा अनुभव

मोना सिंगसोबत सीन, वरळीत शूटिंग अन् पोलिसाची भूमिका; 'मिस्ट्री'निमित्त क्षितीश दातेचा पहिल्या हिंदी वेबसीरिजचा अनुभव

'धर्मवीर' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता म्हणजे क्षितीश दाते. क्षितीशने 'धर्मवीर', 'मुळशी पॅटर्न', 'सरसेनापती हंबीरराव', 'फुलवंती' अशा विविध सिनेमांतून साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांना चांगल्याच आवडल्या. क्षितीशने साकारलेली एकनाथ शिंदेंची भूमिकाही खूप गाजली. क्षितीशने 'मिस्ट्री' या वेबसीरिजनिमित्ताने हिंदी इंडस्ट्रीत प्रथमच काम केलंय. त्यानिमित्त शूटिंगचा अनुभव आणि रंजक किस्से क्षितीशने लोकमत फिल्मीशी बोलताना शेअर केले

मिस्ट्री वेबसीरिजनिमित्त पहिल्या हिंदी प्रोजेक्टमध्ये काम करण्याचा अनुभव कसा होता?

माझा फार इंटरेस्टिंग अनुभव होता. सेटअप सर्व नवीन असला तरीसुद्धा खूप सुरळीत पार पडलं. मी जे कल्पना करुन गेलो होतो की, भाषा, नवीन लोक, तर तसं काही झालं नाही. चांगल्या उद्देशाने चांगलं काम करायला तुम्ही एकत्र आला असाल तर तुम्ही परके असलात तरी काही फरक पडत नाही. सगळे अनुभवी आणि ताकदीचे कलाकार या वेबसीरिजमध्ये आहेत. शिशिर शर्मा सारखे ज्येष्ठ नट या सीरिजमध्ये कॅमिओ करत आहेत. राम कपूर प्रमुख भूमिकेत आहेत, मोना आहे तर हे सर्व कलाकार अनुभवी आहेत. बनचुके नाहीत.

राम कपूर, मोना सिंगसोबतची ऑन- ऑफ स्क्रीन केमिस्ट्री कशी आहे?

रामची विनोदबुद्धी कमाल आहे. तो स्वतः एक उत्तम अभिनेता असल्याने तो सहकलाकारांना खूप कंफर्टेबल करुन घेतो. छोटा प्रसंग सांगायचा झाला तर, १८ ऑक्टोबरला माझा वाढदिवस होता . तो वाढदिवस आमच्या सेटवर शूटिंगच्या दिवशी साजरा झाला. दिवसभर माझ्या बर्थडेचं सेलिब्रेशन झालं. त्याचदिवशी शूटला सगळे होते. इतक्या प्रेमाने सर्वांनी माझा वाढदिवस सेलिब्रेट केला. नायगावला आम्ही शूट करत होतो. मी कोणा मित्रालाही भेटलो नव्हतो. त्यामुळे कोणाचाच अभाव जाणवला नाही. त्यामुळे रोज एकत्र जेवण करणं, मोकळेपणाने गप्पा मारणं होत होतं. हे प्रत्येकवेळी व्हावं. कारण हीच एनर्जी सीन करताना ट्रान्सफर होते.  


तुझा आणि मोना सिंगचा एक सीन व्हायरल झालाय, त्याविषयी?

आम्ही शूटच्या वेळीच हा सीन करताना खूप हसत होतो. आमचा दिग्दर्शक रिषभ सेठ प्रत्येक कलाकाराला अभिनय करताना स्पेस देतो. आता स्क्रीप्टव्यतिरिक्त एक ह्यूमर काढणे, हलकेफुलके क्षण शोधणे या गोष्टींसाठी तो खूप वाव देतो. आम्ही तो पार्ट इथे वरळी गावात शूट केलाय. हा सीन ट्रेलरमध्येही ठेवला. त्यामुळे ते खूप पसरलं. आजही अनेक मित्र बघतात तो सीन, तेव्हा तेही सांगतात की आम्ही खूप हसलो.

वेबसीरिजमध्ये लाऊड कॉमेडी कुठे नाही. तो अगदी निरागस ह्यूमर आहे. आपण जे स्किट करतो तशी कॉमेडी नाही. अगदी सहज, पात्रांमधून जे पटकन निरागसपणे निघतं अशी कॉमेडी अपेक्षित होतं. म्हणजे ह्यूमरने सीनचा कंटेंट नाही मारला पाहिजे, ही जाणीव प्रत्येकाला होती

पहिल्यांदाच पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. कोणत्या अभिनेत्याला फॉलो केलं होतंस का?

प्रत्येक अभिनेता हा त्याच्या आयुष्यात एकदातरी पोलीस अधिकारी साकारतो. पोलीस, वकील ही पात्रं आता सिनेमांमध्ये इतकी कॉमन आहेत. कॉमेडी आणि पोलीस हे अनेक जणांनी केलंय. उदा. गिरीश कुलकर्णी सरांनी 'अग्ली'मध्ये काम केलंय. 'हंगामा' सिनेमात मनोज जोशींनी, लक्ष्यामामाने कितीतरी सिनेमात पोलीस अधिकारी केलाय. त्यामुळे मी कोणालाही फॉलो केलं नाही.

आपला निरागसपणा मी त्या रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. स्वतःचं व्यक्तिमत्व,  स्वतःमधली विनोदबुद्धी दाखवण्याची संधी होती. कोणत्यातरी नटाला एकदा खाकी वर्दी घालून पोलीस किंवा सैनिक करायची इच्छा असते. त्यात रुबाब असा असतो ना! त्यामुळे आता माझं हेही करुन झालंय. या सीरिजमध्ये पोलीस रुबाबदार नाही करायचाय थोडा विनोदी करायचाय. सुदैवाने ते जुळून आलं.

देवाशपथ, लोकमान्य मालिकेनंतर पुन्ही टीव्हीवर कधी दिसणार?

माझी इच्छा आहे, पण मी स्वतःला मूडनुसार सांभाळतो. अभिनेत्याला पदरी पडतं त्यातलंच निवडावं लागतं. माझा जेव्हा मूड होता तेव्ही मी सलग टेलिव्हिजन केलं. सध्या माझा मूड नाटक, सिनेमा, वेबसीरिज करण्याचा आहे. या सगळ्या धडपडीत पुन्हा आग्रहाने टेलिव्हिजन करा, असा नाहीये. अपवाद लोकमान्य मालिकेचा.  लोकमान्यांची भूमिका इतकी विविधतापूर्ण आणि अभ्यासपूर्ण आहे. मी शेंगा खाल्ल्या नाहीत पुरते लोकमान्य शिकलोय शाळेत, त्यापलीकडे लोकमान्य टिळक नक्की काय होते याचा अभ्यास करता आला. लोकमान्यांसारखी चॅलेंजिंग भूमिका आली तर सगळ्यातून मार्ग काढून टेलिव्हिजन उद्यापासून करायला लागेल. सध्या मी नाटक, सिनेमात रमलोय.

आगामी प्रोजेक्ट्स?

एक अॅक्शन फिल्म आहे. याशिवाय एक इंटरेस्टिंग थ्रिलर फिल्म आहे. त्यात एकूण सात कलाकार आहेत. एका रात्रीची गोष्ट आहे. आम्ही ती गोव्यात शूट केलीय. यात सुबोध भावे, मी आहे, सायली फाटक, संस्कृती बालगुडे, राहुल पेठे, स्वानंदी टिकेकर, सिद्धार्थ मेनन आहे. आम्ही योग्यवेळच्या रिलीजची वाट पाहत आहोत. या सिनेमासाठी  आम्ही खूप उत्सुक आहोत. 

'धर्मवीर ३' येणारेय का??

ते सगळं आमच्या गुरुजींच्या हातात आहे. मंगेश देसाई निर्माते आहेत  आणि प्रवीण तरडे सर. ते पण सर्व मूडवर सांभाळतात. सध्या ते 'देऊळ बंद २'चं शूटिंग करत आहेत. आणि 'मुळशी पॅटर्न २'  करायचा त्यांचा विचार होता. हे दोन झाल्याशिवाय 'धर्मवीर ३'ला ते हात घालतील असं मला वाटत नाही. त्यांचंही सर्व मूडवर असतं. पण अजूनतरी चर्चा नाहीय. 

Web Title: kshitish date talk about mistry webseries experience with mona singh ram kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.