'ठरलं तर मग'मध्ये पूर्णा आजीची एन्ट्री, प्रोमो पाहून चाहते खूश; म्हणाले- "अंगावर काटा आला..."
By कोमल खांबे | Updated: October 17, 2025 16:50 IST2025-10-17T16:49:40+5:302025-10-17T16:50:38+5:30
ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर 'ठरलं तर मग'मध्ये पूर्णा आजींची भूमिका कोण साकारणार? पूर्णा आजी पुन्हा मालिकेत दिसणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता.

'ठरलं तर मग'मध्ये पूर्णा आजीची एन्ट्री, प्रोमो पाहून चाहते खूश; म्हणाले- "अंगावर काटा आला..."
'ठरलं तर मग' ही टेलिव्हिजनवरील अतिशय लोकप्रिय मालिका आहे. मालिकेतील सायली आणि अर्जुन यांच्याबरोबरच पूर्णा आजी हे पात्रदेखील प्रचंड गाजलं. या भूमिकेला चाहत्यांकडून पसंती मिळाली. दिवगंत अभिनेत्री ज्योती चांदेकर 'ठरलं तर मग' मालिकेत पूर्णा आजीची भूमिका साकारत होत्या. त्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं होतं. त्यामुळेच त्यांच्या निधनाने चाहते हळहळले होते. ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर 'ठरलं तर मग'मध्ये पूर्णा आजींची भूमिका कोण साकारणार? पूर्णा आजी पुन्हा मालिकेत दिसणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता.
'ठरलं तर मग'च्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतक मालिकेत आता नव्या पूर्णा आजीची एन्ट्री झाली आहे. याचा प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे. प्रोमोमध्ये सुभेदारांच्या घरात पूर्णा आजी एन्ट्री घेत असल्याचं दिसत आहे. पूर्णा आजीला पाहून 'ठरलं तर मग' मालिकेतील कलाकारही खूश झाले आहेत. या व्हिडीओवरुन पूर्णा आजीच्या भूमिकेत कोण दिसणार? याचा अंदाज चाहत्यांनी लावला आहे.
या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. 'ठरलं तर मग'मध्ये पूर्णा आजीची भूमिका साकारणारी अभिनेत्री रोहिणी हट्टांगडी असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. "रोहिणी हट्टांगडी", "होणार सून मी ह्या घरची मधली आजी", "अंगावर काटा आला, असं वाटलं जुनी पूर्णा आजी आली", अशा अनेक कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत. या नव्या पूर्णा आजीला पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.