मुस्लीम पत्नीसाठी रोजे ठेवतो हिंदू अभिनेता, म्हणाला "१२-१३ तास ​​पाण्याविना..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 12:33 IST2025-03-27T12:33:03+5:302025-03-27T12:33:57+5:30

अभिनेता नुकतंच एका मुलाखतीमध्ये इस्लाम धर्माविषयी मोकळेपणे व्यक्त झाला.

Yeh Rishta Kya Kehlata Hai Fame Sachin Tyagi Fasts During Ramadan 2025 With Muslim Wife Rakshanda Khan | मुस्लीम पत्नीसाठी रोजे ठेवतो हिंदू अभिनेता, म्हणाला "१२-१३ तास ​​पाण्याविना..."

मुस्लीम पत्नीसाठी रोजे ठेवतो हिंदू अभिनेता, म्हणाला "१२-१३ तास ​​पाण्याविना..."

मुस्लीम समुदायासाठी सर्वात पवित्र समजला जाणाऱ्या रमजान (Ramadan २०२५) महिन्याला २ मार्च रोजी सुरुवात झाली. या संपूर्ण महिन्यात सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत रोजा (उपवास) पाळला जातो. रमजान महिन्यातील उपवास हा इस्लामच्या पाच स्तंभांपैकी एक आहे. हा महिना मुस्लिम लोक पहाटेपासून सूर्यास्तापर्यंत दिवसाच्या प्रकाशात उपवास करून घालवतात.  फिल्म इंडस्ट्रीमध्येही अनेक मुस्लिम कलाकार रोजाचा उपवास करतात. पण, एक हिंदू अभिनेता आहे, जो आपल्या मुस्लीम पत्नीबरोबर रोजे ठेवतो. 

धर्माची भिंत पाडून आंतरधर्मीय लग्नं केलेली अनेक जोडपी टीव्ही इंडस्ट्रीत आहे. असंच एक सेलिब्रिटी जोडपं म्हणजे सचिन त्यागी (Sachin Tyagi) व रक्षंदा खान (Rakshanda Khan). रक्षंदा खान ही मुस्लिम तर सचिन त्यागी हा हिंदू आहे. सचिन आणि रक्षंदा एकमेकांच्या धर्मांचा आदर करतात आणि दोन्ही धर्माचे सण मोठ्या उत्साहात साजरे करतात. रमजानच्या या पवित्र महिन्यात रक्षंदा दररोज रोजा करतेय. तिच्यासोबत सचिनसुद्धा रोजाचा उपवास करतो. नुकतंच एका मुलाखतीमध्ये त्यानं याबद्दल भाष्य केलंय. 

टेली मसालाशी बोलताना सचिन रमजानबद्दल म्हणाला, "मला आधी खूप आश्चर्य वाटायचं की तीस दिवसांपर्यंत कोणी कसा उपवास करू शकतो? माझा विश्वासच बसत नव्हता. आता तर हे माझ्या घरातच होतं. आता तिच्यासोबत मीही रोजे ठेवतो. अकीदा (प्रेम आणि विश्वास) असेल तर माणूस पाण्यावरही जगू शकतो.  रोजा ठेवल्यावर १२-१३ तास ​​पाण्याविना काढावे लागतात. हे खूप कठीण आहे. पण जेव्हा विश्वास असतो, तेव्हा लोक डोंगर फोडून रस्तेही बांधतात. त्यामुळे पाण्याविना दिवस काढणं सहज शक्य आहे".


इस्लामबद्दल सचिन म्हणाला, "रक्षंदाला भेटलो होतो तेव्हा मला इस्लाम म्हणजे काय हे जाणून घ्यायचं होतं. म्हणून मी हदीस वाचली. त्यात तीन हजार मुद्दे होते, त्यापैकी मी भाषांतरित केलेले  १२००-१३००  समजून घेण्याचा प्रयत्न केला.  इतरांबद्दल माहिती नाही, पण मला असं वाटतं की प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने त्याचा अर्थ काढत आहे. सर्वजण हेच म्हणतात की देव एकच आहे.  मला काहीच वेगळं वाटलं नाही, सगळं सारखंच वाटलं. सर्व धर्मात तेच सांगितलं गेलंय".

सचिनच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर स्टार प्लस वाहिनीवरील 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत मनीष गोयंकाची भूमिका साकारून तो घराघरात पोहोचला.  गेल्या अनेक वर्षांपासून सचिन या शोमध्ये दिसत आहे. तर रक्षंदा खानने छोट्या पडद्यावर अनेक खलनायकी भूमिका साकारल्या आहेत. तिने 'कसम से', 'जस्सी जैसी कोई नहीं', 'नागिन 3' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलंय.

Web Title: Yeh Rishta Kya Kehlata Hai Fame Sachin Tyagi Fasts During Ramadan 2025 With Muslim Wife Rakshanda Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.