छोट्या पडद्यावरील 'द्रौपदी'च्या घरी घडलेलं 'महाभारत', नवऱ्याला कंटाळून सोडला अभिनय
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 09:24 IST2026-02-25T09:23:31+5:302026-02-25T09:24:03+5:30
Roopa ganguly: रुपा गांगुली यांच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. इतंकच नाही तर एकेकाळी त्यांनी चक्क ३ वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

छोट्या पडद्यावरील 'द्रौपदी'च्या घरी घडलेलं 'महाभारत', नवऱ्याला कंटाळून सोडला अभिनय
1988 साली छोट्या पडद्यावर तुफान गाजलेली मालिका म्हणजे महाभारत. बी. आर. चोप्रा याची ही पौराणिक मालिका आजही प्रेक्षकांमध्ये तितकीच लोकप्रिय आहे. त्यामुळे या मालिकेविषयी, त्यातील कलाकारांविषयी नेटकऱ्यांमध्ये कायमच चर्चा रंगत असते. सध्या सोशल मीडियावर या मालिकेतील द्रौपदी अर्थात अभिनेत्री रुपा गांगुली (Roopa ganguly) यांची चर्चा होतीये.
'महाभारत' या मालिकेत द्रौपदीची भूमिका साकारुन रुपा गांगुली प्रचंड लोकप्रिय झाल्या. त्यामुळे त्याकाळी त्यांची बरीच चर्चा व्हायची मात्र, प्रोफेशनल लाइफसोबतच त्यांचं पर्सनल आयुष्यदेखील तितकंच चर्चिलं गेलं. रुपा गांगुली यांच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. इतंकच नाही तर एकेकाळी त्यांनी चक्क ३ वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
१९८४ मध्ये 'पार' या सिनेमातून रुपाने तिच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. त्यानंतर, 'प्रतीक', 'तूफान', 'कमला की मौत', 'अग्नि कन्या' आणि 'प्यार के देवता' यांसारख्या अनेक सिनेमा, मालिकांमध्ये काम केलं. मात्र, महाभारत ही मालिका त्यांच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरली. या मालिकेमुळे त्या रातोरात स्टार झाल्या. परंतु, प्रसिद्धीझोतात असतांनाच अचानकपणे त्यांनी इंडस्ट्रीतून काढता पाय घेतला. त्यांच्या या एक्झिटमागे त्यांचा पती कारणीभूत असल्याचं म्हटलं जातं.
रुपा गांगुली यांनी २००९ मध्ये कलाविश्वाला रामराम केला. सच्च का सामना या कार्यक्रमात त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला. यावेळी त्यांनी अभिनय सोडण्यामागचं कारण, आत्महत्येचा केलेला प्रयत्न यांसारख्या विषयावर भाष्य केलं.
पहिल्या पतीमुळे सोडला अभिनय
१९९२ मध्ये रुपा यांनी ध्रुवा मुखर्जी यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. मात्र, लग्नाच्या १५ वर्षानंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे रुपा यांचं कलाविश्वात काम करणं ध्रुवा यांना मान्य नव्हतं. त्यामुळेच ते सतत रुपा यांच्यावर अभिनय सोडण्यासाठी दबाव टाकत होते. इतकंच नाही तर ध्रुवा, रुपा यांना घरखर्चाचेही पैसे देत नव्हते. त्यामुळे रुपा यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.
आत्महत्येचा केला प्रयत्न
ध्रुवा यांच्यासोबत विभक्त झाल्यानंतर रुपा बंगाली गायक दिब्येंदू मुखर्जी यांच्या प्रेमात पडल्या. मात्र, त्यांचं हे नातं सुद्धा फार काळ टिकलं नाही. परंतु, हे नातं तुटल्यानंतर त्यांनी तीन वेळा आत्महत्या करायचा प्रयत्न केला होता. विशेष म्हणजे त्यांना आलेल्या या अनुभवांमुळे त्यांच्या मनात पुरुषांविषयीचं मत पूर्णपणे बदललं होतं. त्यांना पुरुषांवर विश्वास ठेवणं कठीण झालं होतं. दरम्यान, रुपा गांगुली यांना अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला आहे. इतकंच नाही तर कलाविश्वासह त्या राजकारणातही नशीब आजमावलं आहे.