"आमचं बाळ आमच्यासोबत नाही..."; मराठमोळ्या इन्ल्फ्लुएन्सर कपलच्या आयुष्यातील दुःखद क्षण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 12:17 IST2026-02-24T12:12:58+5:302026-02-24T12:17:03+5:30
मराठी इन्फ्लुएन्सर जोडीच्या आयुष्यात दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काही महिन्यांपूर्वी या जोडीने आई-बाबा होणार ही बातमी शेअर केली होती. परंतु काही तासांपूर्वी त्यांनी सोशल मीडियावर बाळ गमावलं असल्याची भावुक बातमी सर्वांसोबत शेअर केली.

"आमचं बाळ आमच्यासोबत नाही..."; मराठमोळ्या इन्ल्फ्लुएन्सर कपलच्या आयुष्यातील दुःखद क्षण
मराठी इन्फ्लुएन्सर जोडी सुशील अहिरे आणि किंजल दमानी यांच्या आयुष्यात दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काही महिन्यांपूर्वी किंजल आणि सुशील यांनी ते आई-बाबा होणार ही बातमी शेअर केली होती. परंतु काही तासांपूर्वी त्यांनी सोशल मीडियावर बाळ गमावलं असल्याची भावुक बातमी सर्वांना सांगितली आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे.
सुशील आणि किंजल यांनी पोस्ट लिहून सांगितलं की, ''हे लिहिणं आणि इथे शेअर करणं आमच्यासाठी अजिबात सोपं नव्हतं. खरं तर आम्हाला तुमच्यासोबत आमच्या आयुष्यातील सर्वात आनंदाची बातमी शेअर करायची होती, पण दुर्दैवाने हा काळ आमच्या आयुष्यातील सर्वात कठीण आणि दुःखद टप्पा ठरला. आम्ही हे इथे शेअर करत आहोत कारण अनेक जण आम्हाला मेसेज करून विचारत होते की आम्ही आई-बाबा होणार आहोत का... हो, आम्ही आई-बाबा होणार होतो, पण आता आमचं बाळ आमच्यासोबत नाही.''
''एका अत्यंत दुर्मिळ आणि हृदयाच्या गंभीर प्रॉब्लेममुळे आम्ही आमच्या बाळाला गमावलं. आमचं आयुष्य आता पूर्वीसारखं कधीच नसेल, कारण आमच्या शरीराचा एक भाग आम्ही त्याच्यासोबत गमावला आहे. आम्ही सध्या प्रचंड दु:खात, रागात आणि धक्क्यामध्ये आहोत. या धक्क्यातून सावरण्यासाठी आम्ही प्रत्येक दिवस कसाबसा ढकलत आहोत. आयुष्यात कोणतीही गोष्ट तुम्हाला अशा प्रसंगाचा सामना करण्यासाठी तयार करू शकत नाही.''
''पाच महिने त्याला माझ्या गर्भात जपण्याचं भाग्य मला मिळालं आणि तो नेहमीच आमचा एक भाग राहील. आमचा लाडका बाळ... कायमचा... त्याला तुमच्या प्रार्थनांमध्ये आठवणीत ठेवा.'', अशी पोस्ट शेअर करत त्यांनी ही दुःखद गोष्ट सर्वांना सांगितली. चाहत्यांनी कमेंट्सच्या माध्यमातून त्यांचं सांत्वन केलं असून त्यांना धीर दिला आहे.