Vishakha Subhedar : काही तर नवं हवं... म्हणत ट्रोल करणाऱ्या युजरला विशाखा सुभेदारनं असं दिलं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 17:33 IST2022-12-15T17:32:06+5:302022-12-15T17:33:01+5:30
Vishakha Subhedar : होय, शुभविवाह या मालिकेत विशाखा महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. ही बातमी समोर आली आणि विशाखाचे चाहते खुश्श झालेत. काहींनी मात्र तिला ट्रोल करायला सुरूवात केली.

Vishakha Subhedar : काही तर नवं हवं... म्हणत ट्रोल करणाऱ्या युजरला विशाखा सुभेदारनं असं दिलं उत्तर
स्टॅण्ड अप कॉमेडीयन व अभिनेत्री विशाखा सुभेदार हिची बातच न्यारी... विशाखा स्टेजवर आली रे आली की हास्याचे कारंजे फुटतात. फु बाई फु, कॉमेडीची बुलेट ट्रेन, महाराष्ट्राची हास्यजत्रा अशा एक ना अनेक शोमधून विशाखाने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. अभिनय क्षेत्रात येण्याआधी लिपस्टिक, साड्या विकणारी विशाखा महाराष्ट्राचा सुपरस्टार या शोमध्ये झळकली आणि तिच्या आयुष्याला नवी कलाटणी मिळाली. यानंतर तिनं कधीच मागे वळून बघितलं नाही. आता विशाखा वर्षभराच्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसणार आहे.
होय, शुभविवाह या मालिकेत विशाखा महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. स्टार प्रवाहवर येत्या 16 जानेवारीपासून ही मालिका सुरू होतेय. ही बातमी समोर आली आणि विशाखाचे चाहते खुश्श झालेत. काहींनी मात्र तिला ट्रोल करायला सुरूवात केली.आता या ट्रोल करणाऱ्यांना विशाखानं सणसणीत उत्तर दिलं आहे.
विशाखाने शुभविवाह मालिकेचा प्रोमो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आणि एका युजरने तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. ‘कलाकार म्हणून आपल्या सगळ्यांचा आदर आहे, परंतू आता काहीतरी नवीन हवं...,’ अशी कमेंट या युजरने केली. त्यावर विशाखानेही त्याला खडे बोल सुनावले. ‘जसं बुलेट ट्रेननंतर जत्रा नवं होतं अगदी तसंच... हे माझं नवीन काम आहे...आणि आधी नीट तर सुरु होऊ दे. बघा आणि मग नकारात्मक कमेंट करा...’, असं उत्तर तिने त्या युजरची बोलती बंद केली.
शुभविवाह या मालिकेत मधुरा देशपांडे, यशोमन आपटे, विशाखा सुभेदार, कुंजिका काळविंट, अभिजीत श्वेतचंद्र हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.