"महाराष्ट्राची हास्यजत्रा सोडताना मनात विचार होता की...", विशाखा सुभेदार यांनी अखेर सांगितलं शो सोडण्यामागचं कारण
By कोमल खांबे | Updated: November 3, 2025 14:04 IST2025-11-03T13:58:04+5:302025-11-03T14:04:09+5:30
अनेक कॉमेडी शोमध्ये काम केलेल्या विशाखा यांच्या अभिनय आणि विनोदाचे विविध पैलू हे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमध्ये पाहायला मिळाले. त्यामुळेच त्यांनी शोमधून एक्झिट घेतल्यावर चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता. याबाबत विशाखा सुभेदार यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.

"महाराष्ट्राची हास्यजत्रा सोडताना मनात विचार होता की...", विशाखा सुभेदार यांनी अखेर सांगितलं शो सोडण्यामागचं कारण
विशाखा सुभेदार या मराठी कलाविश्वातील उत्तम नट आणि लोकप्रिय अभिनेत्री. अनेक मालिका, नाटक आणि काही सिनेमांमध्येही त्या विविधांगी भूमिका साकारताना दिसल्या. पण, त्यांना ओळख मिळवून दिली ती त्यांच्या विनोदाच्या टॅलेंटने. अनेक कॉमेडी शोमध्ये काम केलेल्या विशाखा यांच्या अभिनय आणि विनोदाचे विविध पैलू हे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमध्ये पाहायला मिळाले. त्यामुळेच त्यांनी शोमधून एक्झिट घेतल्यावर चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता. याबाबत विशाखा सुभेदार यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.
विशाखा सुभेदार यांनी राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी महाराष्ट्राची हास्यजत्रा सोडण्याबाबत भाष्य केलं. त्या म्हणाल्या, "आपण सगळेच परिस्थितीला घाबरतो. गाडी बंद पडली तरी पुढे काय होणार, असा प्रश्न पडतो. त्यामुळे घाबरायला होतंच. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडताना मनात हाच विचार होता की दुसरं काहीतरी केलं पाहिजे. पण, लोक स्वीकारतील का? हा प्रश्न होता. हास्यजत्रा जरी विनोदी असली तरी त्यात अभिनयाचे अनेक कंगोरे सगळेच कलाकार दाखवतात. बायकांच्या मागे असलेलं एक ममत्व, स्त्रीत्व तुम्हाला अनेक स्किटमध्ये दिसेल. माझ्याही स्किटमध्ये अनेकवेळा ते दिसलेलं आहे. त्यामुळे एक व्हिलन, एक करुणा दाखवणारं किंवा टचकन डोळ्यांत पाणी आणणारं असं कॅरेक्टर आपण निभावू शकतो याची कात्री नक्कीच लोकांना होती".
पुढे त्या म्हणाल्या, "मी का रे दुरावा, शेजारी शेजारी पक्के शेजारी या मालिकांमध्ये वेगळ्या भूमिकेत दिसले. त्यामुळे मला वेगळ्या भूमिकांमध्ये पाहायची लोकांना सवय आहे. पण, व्हिलन मी आत्तापर्यंत केलेला नव्हता. पण, ते कॉमेडी होऊ नये यासाठी अभ्यास करावा लागला. त्यामुळे हास्यजत्रा सोडताना तशी भीती वाटली नव्हती. हास्यजत्रा सोडताना आता पुढे काय असा प्रश्न होता. पण, काम मिळेल यावर विश्वास होता. आपण चांगलं काम करतो त्यामुळे काम मिळेल, हा विश्वास होता. आणि नाटकही सुरू होतंच".