संभाजी महाराजांच्या भूमिकेतला विकी कौशल मराठी अभिनेत्याला रुचेना, म्हणाला- "लहान तोंडी मोठा घास घेतोय पण..."
By कोमल खांबे | Updated: January 25, 2025 16:06 IST2025-01-25T16:05:26+5:302025-01-25T16:06:16+5:30
छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या विकी कौशलच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुकही होत आहे. पण, मराठी अभिनेत्याला मात्र संभाजी महाराजांच्या भूमिकेतील विकी कौशल रुचलेला नाही.

संभाजी महाराजांच्या भूमिकेतला विकी कौशल मराठी अभिनेत्याला रुचेना, म्हणाला- "लहान तोंडी मोठा घास घेतोय पण..."
विकी कौशलच्या 'छावा' सिनेमाची सर्वत्र चर्चा आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलरमुळे सिनेमाबाबत चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. या सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या विकी कौशलच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुकही होत आहे. पण, मराठी अभिनेत्याला मात्र संभाजी महाराजांच्या भूमिकेतील विकी कौशल रुचलेला नाही. 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेता अजिंक्य राऊतने याबाबत भाष्य केलं आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत मराठी अभिनेत्याला पाहायला आवडलं असतं, असं म्हणत त्याने खंत व्यक्त केली आहे. अजिंक्यने त्याच्या इन्स्टावर नुकतंच ask me सेशन घेतलं होतं. या सेशनमध्ये चाहत्याने त्याला छावाच्या ट्रेलरबद्दल प्रश्न विचारला.
काय म्हणाला अजिंक्य?
"ट्रेलर तर खूपच कमाल आहे. आणि विकी कौशल हा उत्तम अभिनेता आहे. पण, तरी मला असं वाटतं की संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी मराठी अभिनेता हवा होता. मराठी अभिनेता संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसला असता तर आनंद झाला असता. पण, मराठी इंडस्ट्री किंवा मराठी कलाकार म्हणून कदाचित आम्ही कुठेतरी कमी पडत असू. लहान तोंडी मोठा घास घेतोय. पण, मला एक प्रेक्षक म्हणून आणि मराठी इंडस्ट्रीतील एक कलाकार म्हणून असं वाटतंय की मराठी मातीतल्या या भूमिका मराठी अभिनेत्याने साकाराव्या. किंवा असा कोणी अभिनेता तयार व्हावा जो या भूमिका साकारू शकेल. मुंज्या, चंदू चॅम्पियन किंवा महाराजांची भूमिका असो मराठी व्यक्तीने या व्यक्तिरेखा साकारायला हव्या".
विकी कौशलच्या छावा सिनेमातील काही दृश्यांमुळे वाद निर्माण झाला आहे. ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत असलेला विकी कौशल लेझीम खेळताना आणि नृत्य करत असल्याचं दाखविण्यात आलं आहे. ट्रेलरमधील या दृश्यांवर शिवप्रेमींनी आक्षेप घेतला आहे. सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नसल्याचा आक्रमक पवित्राही काही शिवप्रेमींकडून घेण्यात आला आहे.
कधी प्रदर्शित होणार छावा?
'छावा' सिनेमा येत्या १४ फेब्रुवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. तर रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंची भूमिका साकारणार आहे. संतोष जुवेकर, सुव्रत जोशी या मराठी कलाकारांचीही सिनेमात वर्णी लागली आहे. लक्ष्मण उत्तेकर यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.