"माझ्या घरात थोडीच झाला आहे, मी का बोलू?" मालेगाव घटनेनंतर उत्कर्ष शिंदेंचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 14:56 IST2025-11-28T14:45:30+5:302025-11-28T14:56:49+5:30
मालेगाव पीडित कुटुंबाच्या भेटीनंतर उत्कर्ष शिंदेनं एक अत्यंत भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

"माझ्या घरात थोडीच झाला आहे, मी का बोलू?" मालेगाव घटनेनंतर उत्कर्ष शिंदेंचा सवाल
नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे तीन वर्षीय बालिकेचे अपहरण करुन तिच्यावर लैंगिक अत्याचारानंतर तिचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनेसंपूर्ण महाराष्ट्र हादरला. या नराधमी कृत्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा करावी, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, आज लोकप्रिय मराठी गायक, संगीतकार तसेच अभिनेता उत्कर्ष शिंदेनं डोंगराळे येथे येऊन पीडीत चिमुकलीच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले.
पीडित कुटुंबाची भेट घेतल्यानंतर उत्कर्ष शिंदेनं पोस्ट शेअर केली. या पोस्टमधून त्यानं या घटनेवर सार्वजनिकरित्या मौन बाळगणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर बोलणाऱ्या सेलिब्रिटी, नागरिकांवर कडक शब्दांत टीका केली. त्यानं लिहलं, "माझ्या घरात थोडीच रेप झाला आहे, मी का बोलू? ऑलिम्पिक जिंकलं तरच ती भारताची लेक... मालेगाव डोंगराळे गावातील त्या ३ वर्षाच्या मुलींवर लेंगिंक आत्याचार करून चेहरा ठेचून खून केला. ती भारताची आपल्या महाराष्ट्राची लेक नव्हती का? पॅलेस्टाईनसाठी स्टेटस ठेवणारे आता महाराष्ट्रातील मुली मारल्या जात आहेत, तेव्हा गप्प का आहेत? ज्या समाजाच्या जीवावर आपण मोठे होतो, त्यांना गरजेपुरतं आठवायचं का?" असा संतप्त सवाल उत्कर्ष शिंदेनं केला.
उत्कर्ष शिंदेनं कुटुंबाच्या अवस्थेबद्दल लिहलं, "काल मालेगाव डोंगराळे गावातील बाळाच्या घरी आदरांजली सांत्वनपर भेट दिली. घरात शिरताच आजीचा रडण्याचा आवाज... शांत झालेली आई... कोसळलेल संपूर्ण कुटुंब पाहून... हे दुःख हा परिवार कसं झेलत असेल. घडलेला प्रकार तिचे वडील आणि चुलत्याकडून मला ऐकू गेला नाही. त्या बाळाने हे कृत्य सहनच कस केलं असेल. ठेचून मारले रे त्या लहानग्या जिवाला. विचारांच्यापलीकडे हे घाण कृत्य त्या नराधमाने केलं आणि एक जागरूक नागरिक म्हणून आपण काय केलं? आपलं कर्तव्य काय? रोजचीच बातमी आहे, असं म्हणत महत्व दिलं नाही. बरोबर ना? लाईक–शेअर–सबस्क्राईबसाठी ओरडणारे लोक आता कुठे आहेत?"
"'शिंदेशाही' हे नाव जनतेने दिले आहे, त्यामुळे हे नाव महाराष्ट्रातील प्रत्येक जातीधर्माच्या लोकांसाठी सदैव उभे असेल", असेही त्याने म्हटलं. या समस्येवर कायदेशीर आणि सामाजिक तोडगा काढण्याची गरज उत्कर्ष शिंदेनी व्यक्त केली. तो म्हणाला, "संविधान बळकट करण्याची वेळ आहे. मुलांना शाळेत 'काय बरोबर–काय चूक' शिकवणं चुकीचं कसं? कायद्याचं पालन म्हणजे काय? हे शिकवायला हवं. माझ्या घरात रेप झाला नाही, मग मी का बोलू? असं म्हणणाऱ्यांनो वेळ सांगून येत नसते. सोबत उभे राहिलो, तर कोणीच एकटा पडणार नाही", असं पोस्टमध्ये शेवटी म्हटलं.