वरळीत राहणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत झाली ४५ हजारांची फसवणूक, 'ती' एक चूक पडली महागात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 14:27 IST2025-06-24T14:25:59+5:302025-06-24T14:27:44+5:30
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीला एका इसमाने तब्बल ४५ हजारांचा गंडा घातला आहे. अभिनेत्रीची एक चूक महागात पडून तिचं आर्थिक नुकसान झालं आहे

वरळीत राहणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत झाली ४५ हजारांची फसवणूक, 'ती' एक चूक पडली महागात
मुंबईतील लोकप्रिय अभिनेत्री गार्गी मौशिक पटेल (Gargi Maushik Patel) सोबत फसवणुकीचा प्रकार घडल्याचं उघडकीस आलं आहे. एका वेब-स्कॅममध्ये गार्गी फसली असून यामध्ये तिने तब्बल ४५ हजार रुपये गमावले आहेत. हा प्रकार वरळी परिसरात घडला असून आणि सायबर-क्राईम पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. गार्गीला यामुळे मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागलं असून तिला मनस्ताप झाला आहे. कसा घडला हा प्रकार? जाणून घ्या
कशी झाली गार्गीची फसवणूक
एप्रिल २०२५ मध्ये गार्गीने फेसबुकवर एक जाहिरात दिली. ती वॉशिंग मशीनसह घरातील इतर काही उपकरणे विकणार होती. काही ग्राहकांनी तिला संपर्क केला. गार्गीने तिचा मोबाईल नंबर काही जणांना दिला. १८ एप्रिल रोजी, ‘तरुण’ नावाच्या एका व्यक्तीने गार्गीजवळ असलेलं वॉशिंग मशीन खरेदी करण्यात रस दाखवला. त्यानंतर २४ एप्रिल रोजी गार्गी आणि तरुणचा पुन्हा संपर्क झाला. मी इलेक्ट्रॉनिक्सचा व्यापारी असून जुन्या वस्तूंच्या खरेदी - विक्रीचा व्यवसाय करतो, असं तरुणने गार्गीला सांगितलं. गार्गीने वॉशिंग मशीनसोबत तिच्याजवळ असलेल्या अन्य काही वस्तूंचे फोटो त्याला पाठवले. सर्व वस्तूंची किंमत गार्गीने ४० हजार सांगितली.
तरुणने आधी ३५ हजार रुपये गार्गीला पाठवले. उरलेले ५ हजार नंतर देतो, असं तिला सांगितलं. त्यानंतर तरुणने पुन्हा गार्गीला फोन करुन ५ हजारच्या जागी ५० हजार पाठवले असून उरलेले ४५ हजार परत करायला सांगितलं. तरुणवर विश्वास ठेऊन गार्गीने तिच्या पतीच्या अकाउंटमधून ४५ हजार रुपये त्याला परत पाठवले. पण त्यानंतर गार्गीला आपली फसवणूक झाल्याचं समजलं. तिने तरुणला फोन केले पण त्याने गार्गीचे फोन उचलले नाहीत आणि पैसेही परत केले नाहीत. यामुळे शेवटी गार्गीने वरळी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी सायबर-क्राईम कलमानुसार तरुणविरोधात गुन्हा दाखल केला आहे.