'अशा मुर्खांची मला खरंच लाज वाटते'; बॉडी शेमिंग करणाऱ्यांना दिव्यांकाचं सणसणीत उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 19:50 IST2022-07-26T19:50:00+5:302022-07-26T19:50:00+5:30
Divyanka tripathi: गेल्या काही काळापासून दिव्यांकाला तिच्या शरीररचनेवरुन ट्रोल केलं जात आहे.

'अशा मुर्खांची मला खरंच लाज वाटते'; बॉडी शेमिंग करणाऱ्यांना दिव्यांकाचं सणसणीत उत्तर
बॉडी शेमिंग किंवा शरीररचनेवरुन ट्रोल होणं हे कलाकारांसाठी नवीन नाही. आतापर्यंत अनेक कलाकारांना त्यांच्या शरीरयष्टीवरुन ट्रोल करण्यात आलं आहे. यात खासकरुन अभिनेत्रींचं ट्रोलिंग अधिक होत असल्याचं पाहायला मिळतं. मात्र, अशा ट्रोलर्सला अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने ( divyanka tripathi) सणसणीत उत्तर दिलं आहे.
गेल्या काही काळापासून दिव्यांकाला तिच्या शरीररचनेवरुन ट्रोल केलं जात आहे. दिव्यांका जाड झाली आहे, तिचा फिटनेस बिघडलाय असं म्हणत अनेकांनी तिला ट्रोल केलं. मात्र, अलिकडेच दिव्यांकाने तिचा डान्स करतानाचा एक व्हिडीओ शेअर करत या ट्रोलर्सला उत्तरं दिलं आहे. तिने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये भलीमोठी पोस्ट लिहिली आहे.
काय म्हणाली दिव्यांका?
"मी काही कमेंट वाचल्या ज्यामुळे मला हे सगळं लिहावं लागतंय. एका आदर्श स्त्रीप्रमाणे माझं पोट सपाट नाही हे मी मान्य करते. त्यामुळे मी गरोदर आहे का? किंवा जाड झालीयेस का? असे प्रश्न विचारु नका. आधी मला वाटलं हा व्हिडीओ डिलीट करावा. पण, मी तो केला नाही. त्यापेक्षा तुम्ही तुमची मानसिकता बदला," असं दिव्यांका म्हणाली.
पुढे ती म्हणते, "खरं तर मी फार जाड नाही मात्र, तरीदेखील अनेकांनी वाईट कमेंट केल्या. यावरुन एक समजतं ज्यांना वजनासंबंधीत समस्या आहेत त्यांच्यासोबत तुम्ही कसे वागत असाल. ज्यांच्यात संवेदनशीलता नाही अशा मुर्खांची मला खरंच लाज वाटते. पहिले हा व्हिडीओ मुक्तपणे नाचण्यासंबंधीत होता. पण, आता तोच मुक्तपणे जगण्याबद्दलचा वाटतो."
दरम्यान, गेल्या काही काळापासून दिव्यांकाला अनेकांनी तिच्या वाढत्या वजनावरुन ट्रोल केलं आहे. त्यामुळे या ट्रोलिंगला कंटाळून अखेर दिव्यांकाने सडेतोड उत्तर देत ट्रोलर्सची बोलती बंद केल्याचं पाहायला मिळतं. दिव्यांका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री असून 'ये हैं महोब्बतें' या मालिकेच्या माध्यमातून तिला विशेष लोकप्रियता मिळाली.