प्रसिद्ध टीव्ही अभिनेता थोडक्यात बचावला, गाडीसमोरच कोसळली दरड; अंगठा तुटला अन...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 11:01 IST2023-08-23T11:00:30+5:302023-08-23T11:01:21+5:30
त्यांना आलेला थरारक अनुभव त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

प्रसिद्ध टीव्ही अभिनेता थोडक्यात बचावला, गाडीसमोरच कोसळली दरड; अंगठा तुटला अन...
हिमाचल प्रदेशमध्ये सध्या पाऊस आणि पूरामुळे हाहाकार माजला आहे. कित्येक ठिकाणी भूस्खलन झाल्याने लोकही अडकले आहेत. दुर्दैवाने जीवितहानीही झाली आहे. हिंदी मनोरंजनसृष्टीतील विनोदी अभिनेते राकेश बेदी (Rakesh Bedi) देखील हिमाचल प्रदेशात अडकले होते. त्यातून बचावत ते मुंबईत परतले आहेत. त्यांना आलेला थरारक अनुभव त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
सध्या हिमाचल प्रदेशमधील आठ जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आतापर्यंत ७१ पेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. टीव्ही अभिनेते राकेश बेदी यांनाही थरारक अनुभवाला सामोरे जावे लागले. राकेश बेदी यांनी व्हिडिओ शेअर करत सर्व घटनाक्रम सांगितला. ते म्हणाले,'आपण बघतोय हिमाचल प्रदेशमध्ये काय सुरु आहे. दोन आठवड्यांपूर्वी मी देखील सोलन येथे गेलो होतो. तिथे अभिनयाचं एक लेक्चर होणार होतं. मात्र मी गेलो तेव्हा तिथे भूस्खलन होत होतं. हायवे बंद झाल्याने मी तिथे अडकलो. काही लोकांनी मला एक रस्ता आहे तिथून जा असं सांगितलं. मी त्या रस्त्याने जायला निघालो आणि बरोबर आमच्यासमोरच एक दगड येऊन पडला. देवाचे आभार तो दगड गाडीवर नाही पडला.'
ते पुढे म्हणाले,'आम्ही गाडीतून उतरलो आणि दगड बाजूला करण्याचा प्रयत्न केला. मात्र माझ्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाली. असं वाटलं की माझा अंगठा तुटलाच. तिथल्या लोकांचे काय हाल होत असतील याची मी नक्कीच कल्पना करु शकतो. सगळं लवकर ठीक होईल अशी मी आशा करतो.'
राकेश बेदी टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय विनोदी अभिनेते आहेत. त्यांनी अनेक आयकॉनिक रोल केले आहेत. नुकत्याच रिलीज झालेल्या 'जरा हटके जरा बचके' सिनेमात त्यांची छोटी भूमिका होती. याशिवाय त्यांनी 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्येही काम केले आहे.