मालिकेच्या सेटवर ओळख, मैत्री अन्...; 'तुला जपणार आहे' मधील मीरा 'अशी' पडली प्रेमात, लव्हस्टोरी आहे खास
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 11:29 IST2026-05-08T11:24:40+5:302026-05-08T11:29:48+5:30
'अशी' आहे अभिनेत्री महिमा म्हात्रेची लव्हस्टोरी, स्वत:च सांगितला किस्सा

मालिकेच्या सेटवर ओळख, मैत्री अन्...; 'तुला जपणार आहे' मधील मीरा 'अशी' पडली प्रेमात, लव्हस्टोरी आहे खास
Mahima Mhatre Lovestory: 'तुला जपणार आहे' या मालिकेतून घराघरात पोहोचलेलं नाव म्हणजे अभिनेत्री महिमा म्हात्रे. तिने या मालिकेमध्ये मीरा ही भूमिका साकारली आहे. महिमाने मालिकेत साकारलेलं हे पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. अलिकडेच प्रेक्षकांच्या लाडक्या मीराने अभिनेता रोशन विचारेसोबत साखरपुडा करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. आता लवकरच ते लग्न करणार आहेत. मात्र, महिमा आणि रोशनची प्रेमकहाणी कशी सुरु झाली तुम्हाला माहितीये का? नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री महिमा म्हात्रेने दोघांची पहिली भेट आणि प्रेमकहाणीबद्दल सांगितलं आहे.
अलिकडेच महिमाने 'इट्स मज्जा' सोबत संवाद साधला. यावेळी महिमा म्हणाली, "आम्ही एका सेटवर शूट करत होतो. 'दार उघड बये' पासून मी त्याला ओळखतेय. पण, तेव्हा आमची फार मैत्री नव्हती. आम्ही फार बोलयचो नाही. त्यावेळी आम्ही जास्त बोलायचो नाही पण आम्हाला एकमेकांचे स्वभाव माहित होते. मैत्री नसतानाही आम्ही एकमेकांना ओळखत होतो. त्यानंतर हळूहळू आमची मैत्री होत गेली. मला दीदीसुद्धा म्हणालेली, 'आपला नवरा हा बेस्ट फ्रेंड असायला पाहिजे' मैत्रीपासूनच आमची सुरुवात झाली. आमच्यात छान मैत्री होती. मैत्रीमध्ये जसं एखादी गोष्ट शेअर करताना त्यात फिल्टर लावू नये, अशा बेसिक गोष्टी असतात. आपल्या पार्टनरला आपल्याला सगळं सांगता यावं, हे सगळं हळूहळू घडत गेलं. आमच्या आवडीनिवडी खूप सारख्या आहेत. "
यानंतर अभिनेत्री पुढे म्हणाली, "सेटवर आम्ही एकमेकांशी बोलायचो नाही. हे खूप नंतर घडलं. मालिकेचं शूट सुरू असतानाच मी एमबीएसुद्धा करत होते. त्यात त्याने मला खूप मदत केली. माझे जास्त मित्रच नाहीयेत. त्यामुळे मी रोशनसोबत कनेक्ट झाले. यातून आमची मैत्री झाली आणि इथूनच सुरू झालं. आम्ही डेट नाही केलं कधीच. आम्ही एकमेकांना प्रपोज नव्हतं केलं. साखरपुड्याच्या दिवशी रोशनने गुडघ्यावर बसून 'माझ्याशी लग्न करशील का?' हे माझ्यासाठी पहिलं प्रपोजल होतं. प्रेम हे आपणहून होणं जास्त चांगलं असतं, असं मला वाटतं. " असं महिमाने मुलाखतीत सांगितलं.