लक्ष्मी नारायणाचा जोडा! लग्नानंतर तेजस्विनी लोणारी-समाधान सरवणकर पोहोचले सिद्धिविनायकाच्या मंदिरात, घेतले बाप्पाचे आशीर्वाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 12:48 IST2025-12-06T12:47:51+5:302025-12-06T12:48:43+5:30
लग्नानंतर तेजस्विनी आणि समाधान या नवविवाहित जोडप्याने सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं.

लक्ष्मी नारायणाचा जोडा! लग्नानंतर तेजस्विनी लोणारी-समाधान सरवणकर पोहोचले सिद्धिविनायकाच्या मंदिरात, घेतले बाप्पाचे आशीर्वाद
पूजा बिरारी, प्राजक्ता गायकवाड यांच्यानंतर अभिनेत्री तेजस्विनी लोणारीही लग्नाच्या बेडीत अडकली. गुरुवारी(४ डिसेंबर) दत्त जयंतीच्या मुहुर्तावर शिवसेना युवा नेते समाधान सरवणकर यांच्याशी तेजस्विनी लोणारीचं शुभमंगल सावधान झालं. कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत तेजस्विनी आणि समाधान यांचा विवाहसोहळा पार पडला. तेजस्विनी आता सरवणकर घराण्याची सून झाली आहे. लग्नानंतर तेजस्विनी आणि समाधान या नवविवाहित जोडप्याने सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं.
लग्नानंतर तेजस्विनी आणि समाधान यांनी देवाचे आशीर्वाद घेत त्यांच्या वैवाहिक जीवनाला सुरुवात केली. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन त्यांनी गणरायाचे आशीर्वाद केले. त्यासोबतच प्रभादेवी येथील पुरातन असलेल्या प्रभादेवी माता मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतलं. याचे फोटो समाधान सरवणकर यांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत. "नव्या सहजीवनाची सुरुवात गणरायाच्या मंगल दर्शनाने…! घरातील विवाहानंतरच्या सर्व विधी आणि श्री सत्यनारायण पूजेची मंगलमयता अनुभवून, मी आणि तेजस्विनी श्री सिद्धिविनायकाच्या चरणी नतमस्तक झालो. तसेच प्रभादेवी येथील मुंबईचे पुरातन प्रभादेवी माता मंदिरात जाऊन देवी मातेचेही दर्शन घेतले. या मंगल आशिर्वादांनी आम्हा दोघांनाही नव्या जीवन प्रवासासाठी अधिक ऊर्जा मिळाली", असं कॅप्शन त्यांनी या फोटोंना दिलं आहे.
तेजस्विनी लोणारी हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय नाव आहे. तेजस्विनीने काही मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. तर बिग बॉस मराठीमध्येही ती सहभागी झाली होती. समाधान सरवणकर हे शिवसेना नेते सदानंद सरवणकर यांचे पुत्र आहेत. समाधान हे राजकारणात सक्रिय असून शिंदेंच्या शिवसेना गटात आहेत. समाधान यांच्याशी लग्न करत तेजस्विनीने राजकीय घराण्यात एन्ट्री घेतली आहे.