"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 15:34 IST2025-11-05T15:33:36+5:302025-11-05T15:34:56+5:30
एखादा एलिजिबल बॅचलर आला तर... तेजश्री प्रधानची प्रतिक्रिया

"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
अभिनेत्री तेजश्री प्रधान लग्न कधी करणार? असा प्रश्न चाहत्यांनी अनेकदा तिला विचारलाच आहे. काही वर्षांपूर्वी तिचा अभिनेता शशांक केतकरसोबत घटस्फोट झाला. नंतर तेजश्रीने अद्याप लग्न केलेलं नाही. आता नुकतंच तेजश्रीने लग्नावर प्रतिक्रिया दिली. लग्न करायची इच्छा असल्याचं तिने बोलून दाखवलं. तेजश्री सध्या 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत दिसत आहे. सुबोध भावेने एका मुलाखतीत तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक असल्याचं सांगितलं. तेव्हा तेजश्रीने काय प्रतिक्रिया दिली वाचा.
'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत समर आणि स्वानंदीच्या लग्नाची लगबग सुरु आहे. गोव्यात हे डेस्टिनेशन वेडिंग पाहायला मिळणार आहे. त्याआधी दोघांनी 'कलाकृती मीडिया'ला मुलाखत दिली. मुलाखतीत 'तुम्ही कोणत्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या लग्नासाठी उत्सुक आहात?' असं विचारलं असता सुबोध भावे विचार करायला लागला. तेव्हा तेजश्री स्वत:कडे इशारा करते. मग सुबोध म्हणतो, 'हा, हिचं लग्न कधीतरी होईलच ना. तेव्हा आम्ही परत गोव्याला जाऊ.' यावर तेजश्री जोरात 'नाही' म्हणते.
"ही वीण तुटायची नाही...", मालिका सोडण्याच्या चर्चांवर तेजश्री प्रधानची पहिली प्रतिक्रिया
तेजश्रीचं लग्न खरंच ठरलंय का? तर ती म्हणाली, "मी सुद्धा स्वत:च्याच लग्नासाठी उत्सुक आहे. पण गैरसमज करुन घेऊ नका. माझं लग्न ठरलेलं नाही. अशा बातम्या जर आल्या तर चुकून माझ्यापर्यंत येणारं एखादं स्थळ परत माघारी जाईल. पण मी खऱ्या आयुष्यात डेस्टिनेशन वेडिंग करेन का? तर हा फार पुढचा प्रश्न आहे. मी तो विचार केलेला नाही."
तेजश्रीने २०१४ साली अभिनेता शशांक केतकरशी लग्नगाठ बांधली होती. 'होणार सून मी ह्या घरची' मालिकेच्या सेटवर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते. खऱ्या आयुष्यातही श्री-जान्हवी एकत्र आले होते. मात्र लग्नाच्या एका वर्षातच त्यांच्यात बिनसलं आणि २०१५ साली त्यांचा घटस्फोट झाला.