'तारक मेहता...'फेम आत्माराम भिडेंच्या पत्नीचीही रोहित आर्यासोबत झालेली भेट, म्हणाली- "दोन दिवस आम्ही..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 13:46 IST2025-11-02T13:43:20+5:302025-11-02T13:46:03+5:30
आत्माराम भिडेंची पत्नी 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेत काम करत आहेत. त्यांनी रोहित आर्यासोबत झालेल्या भेटीचा अनुभव सांगितला आहे.

'तारक मेहता...'फेम आत्माराम भिडेंच्या पत्नीचीही रोहित आर्यासोबत झालेली भेट, म्हणाली- "दोन दिवस आम्ही..."
'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेतील मंजू अर्थात अभिनेत्री स्नेहल चांदवडकरने रोहित आर्यासोबत झालेल्या भेटीचा धक्कादायक खुलासा केलाय. स्नेहल या 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील आत्माराम भिडे अर्थात अभिनेते मंदार चांदवडकर यांच्या पत्नी आहेत. राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत स्नेहल यांनी घडलेल्या घटनेचा खुलासा केला.
स्नेहल म्हणाल्या की, ''मला २७ तारखेला फोन आला की ते एक प्रोजेक्ट करत आहेत. त्यासाठी त्यांनी मला थेट मीटिंगसाठी बोलावलं होतं. कारण आधीच त्यांनी माझं काम बघितलं होतं. मी रोहित आर्या यांना भेटले. तिथे अजूनही बरेच कलाकार बसले होते. बोलणं चालू होतं. जे कलाकार निवडले गेले होते, त्यांना बसून वेबसीरिजची संपूर्ण कथा सांगितली. त्यात कोणता कलाकार, कोणती भूमिका करणार आहे हे आम्हाला सांगण्यात आलं.''
''मी आणि माझ्यासोबत एक NSD ची आर्टिस्ट होती. आम्हाला सांगण्यात आलं की, उद्या तुम्हाला मॉक शूट करावं लागणार आहे. जे मुलांचे पालक आहेत आणि कलाकार आहेत, त्यांना शूटिंग कसं असतं हे कळावं म्हणून मॉक शूट करण्यासाठी २९ तारखेला तिथे शूटिंग करण्यासाठी गेलो. ''
''२९ तारखेला जो सीन आम्हाला सांगण्यात आला तो असा होता की, आम्ही एका डे केअरच्या बाहेर उभे आहोत. तिथे आमची मुलं आम्हाला भेटणार आहेत. पण काहीच मुलं खाली येतात आणि काही मुलं येत नाहीत. आमची मुलं का येत नाहीत, हे आम्हाला माहित असतं. कारण ते जे काय कॉल सेंटर चालवत आहेत, त्यात आमची मुलं निवडली गेली आहेत. पण आम्हाला लोकांना दाखवायचं होतं की आमचा याच्याशी काही संबंध नाही. त्यामुळे आम्ही तिथे तणावाचं वातावरण निर्माण करतो. असा एक सीन शूट केला.
''त्यात बॉम्बस्फोट होतो आणि आम्ही सर्व पळून जातो. पुढे असं होतं की, जेव्हा पोलीस येतात तेव्हा ही मुलं स्वतःला कोंडून घेतात. बाहेर असं दिसतं की, यांना किडनॅप करण्यात आलंय. हा सीन आम्ही पुढच्या दिवशी शूट होणार होता. तेव्हा आम्ही नव्हतो.''
''पुढच्या दिवशी आम्ही शूटवर नव्हतो पण मुलं आणि त्यांचे पालक शूटवर होते. दुपारपर्यंत सर्व काही व्यवस्थित चालू होतं. मला काहीच कल्पना नव्हती. पण माझी NSD ची सहकलाकार तिचा फोन आला की, ती घटना रिलमध्ये नाही तर खरोखर अस्तित्वात आणलेली आहे. हे ऐकून खरंच मोठा धक्का बसला कारण, ती लहान मुलं आणि त्या पालकांसोबत आमचं चांगलं नातं निर्माण झालं होतं. सगळे खूप लांब राहणारे होते आणि आशेने शूट करण्यासाठी आले होते. दोन दिवस आम्ही जे रोहित आर्यासोबत राहिलो होतो, तेव्हा जराही कल्पना नव्हती असं काही होऊ शकतं.''