देवीच्या धार्मिक कार्यक्रमात अंगात येण्याचं नाटक केलं? सुधा चंद्रन स्पष्टच म्हणाल्या- "मी इथे स्वतःला..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 12:55 IST2026-01-06T12:53:15+5:302026-01-06T12:55:33+5:30
काही दिवसांपूर्वी धार्मिक कार्यक्रमात सुधा चंद्रन यांच्या अंगात आल्याने नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं होतं. आता सुधा यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे

देवीच्या धार्मिक कार्यक्रमात अंगात येण्याचं नाटक केलं? सुधा चंद्रन स्पष्टच म्हणाल्या- "मी इथे स्वतःला..."
प्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगना सुधा चंद्रन सध्या त्यांच्या एका सोशल मीडिया व्हिडिओमुळे चर्चेत आहेत. नुकतंच सुधा चंद्रन यांच्या घरी देवीचा एक धार्मिक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात एका क्षणी सुधा चंद्रन यांना अंगात आलं होतं. त्यामुळे सुधा यांना सांभाळणंही कठीण झालं होतं. सुधा यांचा हाच व्हिडीओ पाहून काही नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. आता सुधा चंद्रन यांनी या ट्रोलिंगवर मौन सोडले असून टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले आहे.
सुधा चंद्रन यांचा खुलासा
ट्रोलिंगच्या वादावर भाष्य करताना सुधा चंद्रन यांनी झूमला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला की, "मी कोणालाही स्पष्टीकरण द्यायला बांधील नाही. तो माझ्या वैयक्तिक श्रद्धेचा विषय होता. ज्यांना जे बोलायचे आहे ते बोलू दे, मी इथे स्वतःला सिद्ध करण्यासाठी किंवा कोणाचे समाधान करण्यासाठी बसलेले नाही." त्यांनी पुढे असेही स्पष्ट केले की, ''कलाकार म्हणून त्यांना त्यांचे स्वातंत्र्य आहे आणि भक्ती आणि धार्मिक भावना व्यक्त करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असू शकते.''
चाहत्यांचा पाठिंबा
एककीकडे ट्रोलिंग होत असताना, दुसरीकडे सुधा चंद्रन यांच्या चाहत्यांनी त्यांची बाजू सावरून धरली आहे. "सुधा जी एक उत्कृष्ट कलाकार आहेत आणि त्यांच्या कलेचा व श्रद्धेचा सन्मान व्हायला हवा," अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत. सुधा चंद्रन यांनी नेहमीच आपल्या जिद्दीने आणि कलेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या नव्या वादातही त्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडून ट्रोलर्सला शांत करण्याचा प्रयत्न केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
काही दिवसांपूर्वी सुधा चंद्रन यांच्या घरी 'माता की चौकी' हा देवीचा धार्मिक कार्यक्रम झाला. यात सुधा चंद्रन यांच्या अंगात येऊन त्या नृत्य करताना दिसत होत्या. मात्र, काही सोशल मीडिया युजर्सने त्यांच्या नृत्याच्या पद्धतीवर आणि अंगात येण्यावर त्यांना ट्रोल केले. अनेकांनी त्यांच्या श्रद्धेवर आणि सादरीकरणावर टीका केली होती. आता सुधा चंद्रन यांनी स्पष्टीकरण देऊन सडेतोड उत्तर दिलं आहे.