नव्या मालिकेच्या निमित्ताने सुबोध भावे रमला कॉलेजच्या आठवणीत; म्हणाला, 'तेव्हा माझं अफेअर...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 16:19 IST2024-07-03T16:16:53+5:302024-07-03T16:19:07+5:30

कॉलेजमध्ये हिरवळ होती, पण तेव्हा...

Subodh Bhave new serial Tu Bhetashi Navyane he recalls his college days in pune | नव्या मालिकेच्या निमित्ताने सुबोध भावे रमला कॉलेजच्या आठवणीत; म्हणाला, 'तेव्हा माझं अफेअर...'

नव्या मालिकेच्या निमित्ताने सुबोध भावे रमला कॉलेजच्या आठवणीत; म्हणाला, 'तेव्हा माझं अफेअर...'

हँडसम आणि डॅशिंग अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) आगामी नवी मालिका 'तू भेटशी नव्याने' मुळे चर्चेत आहे. या मालिकेतून प्रथमच AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. अभिमन्यू ही प्रोफेसरची भूमिका साकारणाऱ्या सुबोधचा तरुणपणीचा लूक हा AI च्या माध्यमातून साकारण्यात आला आहे. 1999 मधला सुबोध कसा दिसला असता हे AI वापरुन दाखवण्यात आलं आहे. दरम्यान मालिकेच्या निमित्ताने सुबोध खऱ्या आयुष्यातील कॉलेजच्या आठवणीत रमला.

सुबोध भावे आणि शिवानी सोनार यांची जोडी असलेली मालिका 'तू भेटशी नव्याने' लवकरच प्रसारित होणार आहे. यानिमित्त घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सुबोध त्याच्या कॉलेजमधल्या आठवणींमध्ये रमला. एकेकाळी सुबोधची पुण्यातील सिम्बॉयोसिस कॉलेजमध्ये क्रेझ होती. त्या दिवसांबद्दल सुबोध म्हणाला,  "सिम्बॉयसिसचे दिवस मंतरलेले असायचे. नाटक या विषयाचा ध्यास त्या कॉलेजमध्ये लागला. नाटकाची, अभिनयाची आवड निर्माण झाली. पुरुषोत्तममध्ये खऱ्या अर्थाने प्रशिक्षण मिळालं असं मी म्हणेल. कॉलेजमध्ये खूप हिरवळ होती, सुंदर सुंदर मुलं मुली होत्या. पण मी कॉलेजमध्ये फक्त नाटकासाठी जात होतो.  तेव्हा माझं मंजिरीबरोबर आधीच अफेअर होतं आणि ती कॅनडात होती. त्यामुळे तिला कोणीच पाहिलेलं नव्हतं. कॉलेजमधल्या मुलींना मी हे खोटं बोलतोय असंच वाटायचं. त्या मला गिफ्ट्स, गुलाबाची फुलं आणून द्यायच्या. पण मी कमिटेड होतो. मला फक्त नाटकासाठी जायला मजा यायची. पाच वर्ष मी मनसोक्त नाटक केलं. त्यानिमित्ताने माझ्या सगळ्या मित्रांचं काम बघता आलं जे आज इंडस्ट्रीत आहेत ज्यांचं स्वत:चं नाव आहे. त्यांचं काम बघून बघूनच मी आज इथपर्यंत आलो."

८ जुलैपासून 'तू भेटशी नव्याने' मालिका सोनी मराठी वाहिनीवर येत आहे. सुबोधचा AI लूक पाहून चाहत्यांनाही मालिका पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. शिवानी सोनार, प्रिया मराठे, किशोरी आंबिये यांच्याही मालिकेत मुख्य भूमिका आहेत.

Web Title: Subodh Bhave new serial Tu Bhetashi Navyane he recalls his college days in pune