किती गोड! 'शुभविवाह' फेम अभिनेत्री कुंजिकाने लेकाचं केलं बारसं; ठेवलंय 'हे' खास नाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 10:37 IST2026-01-26T10:36:43+5:302026-01-26T10:37:30+5:30
शुभविवाह मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्रीने लेकाचं बारसं केलं आहे. अभिनेत्रीने मुलाचं नाव खूपच खास ठेवलं आहे

किती गोड! 'शुभविवाह' फेम अभिनेत्री कुंजिकाने लेकाचं केलं बारसं; ठेवलंय 'हे' खास नाव
'शुभविवाह' मालिकेतून सर्वांच्या पसंतीस उतरलेली अभिनेत्री कुंजिका काळविंट काही दिवसांपूर्वी आई झाली. कुंजिकाने गोंडस मुलाला जन्म दिला. सर्वांनी या गुड न्यूजबद्दल कुंजिकाचं अभिनंदन केलं. अशातच कुंजिकाने नुकतंच तिच्या लेकाचं बारसं केलं. सध्या कठीण आणि अजब नावं ठेवण्याचा ट्रेंड असताना कुंजिकाने लेकाचं ठेवलेलं गोड नाव सर्वांना भावलं आहे. कुंंजिकाने लेकाचं नाव नेमकं काय ठेवलंय? जाणून घ्या.
कुंजिकाने केलं लेकाचं बारसं
कुंजिकाने तिच्या सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत कुंजिकाचा नवरा तिच्या बाजूला बसलेला दिसत आहे. याशिवाय कुंजिकाने तिच्या मांडीवर मुलाला ठेवलं आहे. कुंजिकाच्या मागे एक बोर्ड दिसतोय जिथे लेकाच्या नावाचा खुलासा झाला आहे. कुंजिकाने लेकाचं नाव कान्हा ठेवलं आहे. या नावाचा उलगडा झालाच सर्वांनी पसंती दिली आहे. याशिवाय कुंजिका आणि तिच्या बाळाला सुदृढ आरोग्यासाठी आशीर्वाद दिले आहेत.

कुंजिकाने काही दिवसांपूर्वी बाळाचा हात घेतल्याचा फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करत कुंजिकाने लिहिलेलं की, ''आज बरोबर एक महिन्यापूर्वी आमच्या आयुष्यात एका सुंदर आणि गोड मुलाचे आगमन झाले आणि आमच्या आनंदाला उधाण आले. गेले चार आठवडे झोप न मिळालेल्या रात्री, बाळाला कडेवर घेऊन मारलेल्या गप्पा आणि शब्दांत वर्णन न करता येणारे प्रेम अशा भावनांनी भरलेले होते.'' अशाप्रकारे भावुक शब्दात कुंजिकाने ही आनंदाची बातमी सर्वांना दिली होती.