जुनं ते सोनं! गंगाधर टिपरेंचं कुटुंबीय आले एकत्र, चाहत्यांना आली 'शिऱ्या' ची आठवण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 15:46 IST2023-03-24T15:42:03+5:302023-03-24T15:46:30+5:30
केदार शिंदेंनी पोस्ट केलेला हा फोटो खूपच खास ठरला.

जुनं ते सोनं! गंगाधर टिपरेंचं कुटुंबीय आले एकत्र, चाहत्यांना आली 'शिऱ्या' ची आठवण
2001 मध्ये आलेली 'श्रीयुत गंगाधर टिपरे' (Shreeyut Gangadhar Tipre) ही मालिका आठवत नाही असं कोणीच नसेल. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटाच्या लोकांमध्ये ही मालिका लोकप्रिय ठरली होती. मालिकेतील आबा म्हणजेच दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar) यांचं पात्र तर सगळ्यांच्याच जवळचं झालं होतं. 2001 ते 2005 पर्यंंत मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. आज 18 वर्षांनी मालिकेतील सर्व कलाकार एकत्र आले आहेत. हे रियुनियन पाहून तुम्हीही जुन्या आठवणीत रमाल हे नक्की.
'श्रीयुत गंगाधर टिपरे' ही मालिका केदार शिंदे (Kedar Shinde) यांनीच दिग्दर्शित केली होती. आता त्यांचा 'महाराष्ट्र शाहीर' हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. याच सिनेमाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमासाठी मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली. दरम्यान केदार शिंदेंनी पोस्ट केलेला एक फोटो खूपच खास ठरला. टिपरे कुटुंबासोबत त्यांनी हा फोटो पोस्ट केला आहे. मालिकेत आबांची भूमिका साकारणारे अभिनेते 'दिलीप प्रभावळकर', शेखर टिपरेची भूमिका करणारे 'राजन भिसे', श्यामल टिपरेच्या भूमिकेतील 'शुभांगी गोखले' आणि शलाकाची भूमिका करणारी 'रेश्मा नाईक' या कलाकारांसोबत केदार शिंदेंनी हा फोटो पोस्ट केला आहे. 'जुनं ते सोनं' असं कॅप्शनही त्यांनी या फोटोला दिलं आहे.
या रियुनियन मध्ये मात्र शिऱ्या म्हणजेच अभिनेता 'विकास कदम' दिसला नाही. सर्वांनाच त्याची उणीव भासत आहे. 'शिऱ्या कुठे आहे दादा' अशा कमेंट या पोस्टवर आल्या आहेत. मात्र इतर कलाकारांना बघून चाहतेही खूश झालेत. प्रत्येकानेच जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
केदार शिंदे त्याचे आजोबा कृष्णराव गणपतराव साबळे अर्थात महाराष्ट्र शाहीर यांच्या आयुष्यावर सिनेमा घेऊन येत आहेत. 'महाराष्ट्र शाहीर' असं सिनेमाचं नाव आहे. अभिनेता अंकुश चौधरीने सिनेमात मुख्य भूमिका साकारली आहे.