"ती होती हे म्हणायला आता जड जातंय..."; प्रिया मराठेच्या आठवणीत सविता प्रभुणे भावुक, पहिल्यांदाच झाल्या व्यक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 18:24 IST2025-10-02T18:23:41+5:302025-10-02T18:24:09+5:30
सविता प्रभुणेंनी प्रिया मराठेच्या निधनावर त्यांची भावुक प्रतिक्रिया दिली आहे. याशिवाय प्रियाबद्दलची आठवण सांगितली आहे

"ती होती हे म्हणायला आता जड जातंय..."; प्रिया मराठेच्या आठवणीत सविता प्रभुणे भावुक, पहिल्यांदाच झाल्या व्यक्त
एक महिन्यांपूर्वी प्रिया मराठेचं निधन झालं. प्रियाच्या निधनानंतर अनेक सेलिब्रिटींच्या भावुक प्रतिक्रिया समोर आल्या. प्रियाचा पती आणि अभिनेता शंतनू मोघेने सुद्धा भावुक प्रतिक्रिया व्यक्त केली. अशातच मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री सविता प्रभुणे या प्रिया मराठेच्या आठवणीत भावुक झाल्या. प्रिया आणि सविता यांनी पवित्र रिश्ता मालिकेत अभिनय केला होता. या मालिकेतील अभिनेता सुशांत सिंग राजपूत सुद्धा या जगात नाही. सविता यांनी प्रिया आणि सुशांत या दोन्ही कलाकारांची आठवण जागवली आहे.
अमोल परचुरेंच्या कॅचअप चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सविता प्रभुणे म्हणाल्या की, ''प्रिया माझ्या इतक्या जवळची मुलगी होती. इतकी गोड मुलगी होती. आता होती म्हणणं सुद्धा मला जड जातंय. हसरी, खेळकर, मज्जा करायचो आम्ही. पवित्र रिश्तानंतर तिच्यासोबत साथ दे तू मला नावाचा प्रोजेक्ट केला. आता अलीकडे वर्ष-दीड वर्षापूर्वी मी तिचं नाटक बघायला गेले होते. परफेक्ट मर्डर नावाचं. असं नको होतं व्हायला. चटका लावून जाणं म्हणतो ना, तसं झालं. मलाही तिच्या आजाराबद्दल खूप उशीरा कळलं आणि खूप धक्का बसला. सगळ्या आमच्या ग्रुपलाच खूप वाईट वाटलं.''
''मध्ये कोणीतरी एक प्रतिक्रिया व्यक्त केली होती की, या काहीच बोलल्या नाहीत. यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. माझं सोशल मीडिया तुम्ही पाहिलं असेल तर मी कुठल्याही बाबतीत व्यक्त होत नाही. व्यक्त होण्यापेक्षा मला काय वाटतं, हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. जवळच्या लोकांना सगळ्यांना माहितीये की, मला याबद्दल किती वाईट वाटलं. किंवा हे लोक माझ्या किती जवळचे होते.''
''सुशांतबद्दल सांगायचं तर, आम्ही तीन वर्ष सलग एकमेकांसोबत काम केलं होतं. आम्ही दिवसरात्र एकमेकांसोबत काम करत होतो. तो इतका गोड मुलगा होता, कामाच्या बाबतीत इतका शिस्तप्रिय आणि मन लावून काम करणारा होता. फोकस होता. त्यामुळे हा मुलगा पुढे चढतच जाणार हे माहित होतं. तसंच झालं, ३ वर्षांनंतर तो फिल्ममध्ये गेला. तो फिल्ममध्ये गेल्यावर आमचा संपर्क खूप कमी झाला. पण सुशांतबद्दल नेहमी कौतुक होतं.''