सारा खान झाली मिसेस पाठक! क्रिशसोबत बांधली लग्नगाठ; सासरे सुनील लहरी गैरहजर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 10:45 IST2025-12-06T10:44:19+5:302025-12-06T10:45:39+5:30
सारा अली खानचं दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकली आहे. ४ वर्ष लहान क्रिश पाठकसोबत तिने सातफेरे घेतले.

सारा खान झाली मिसेस पाठक! क्रिशसोबत बांधली लग्नगाठ; सासरे सुनील लहरी गैरहजर?
'बिदाई'फेम टीव्ही अभिनेत्री सारा खान दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकली आहे. ५ डिसेंबर रोजी तिने क्रिश पाठकसोबत सातफेरे घेतले. विशेष म्हणजे क्रिश तिच्याहून ४ वर्षांनी लहान आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान लग्नात क्रिशचे वडील 'रामायण' फेम अभिनेते सुनील लहरीच दिसले नाहीत. याचा अर्थ ते सारा आणि क्रिशच्या नात्याविरोधात असल्याची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे.
सारा आणि क्रिश पाठक यांनी ६ ऑक्टोबर रोजी कोर्ट मॅरेज केलं होतं. ८ ऑक्टोबरला दोघांनी फोटो पोस्ट करत ही गुडन्यूज चाहत्यांना दिली होती. ते पाहून सर्वांनाच आश्चर्यही वाटलं होतं. दोघांची ओळख डेटिंग अॅपवरुन झाली होती. एक वर्ष डेट केल्यानंतर त्यांनी आधी कोर्ट मॅरेज केलं. तर आता ५ डिसेंबरला सातफेरे घेतले. लग्नात साराने लाल रंगाचा भरजरी लेहेंगा परिधान केला होता. डोक्यावर सुंदर घुंगट घेतला होता. ती अक्षरश: दागिन्यांनी मढलेली दिसत होती इतक्या प्रकारचे दाग दागिने तिने परिधान केलेले दिसत आहेत. भांगेत सिंदूरही दिसत आहे. तर क्रिश पाठकने हिरव्या रंगाची सुंदर शेरवानी घातली होती. त्यावर प्रिंटेड जॅकेटही होतं.
लग्नानंतर दोघांनी पापाराझींसमोर पोज दिली. या लग्नात राजीव ठाकूर, नगमा आणि आवेज दरबार, सृष्टी रोडे, फलक नाज, किंशुक महाजन, जैद दरबार आणि गौहर खान या सेलिब्रिटींनी हजेरी लावली.
सारा आणि क्रिशच्या लग्नसमारंभात क्रिशचे वडील सुनील लहरी दिसत नसल्याची सर्वत्र चर्चा होत आहे. मात्र क्रिश आणि त्याच्या वडिलांचं फारसं जवळचं नातं नाही. कारण क्रिश ९ महिन्यांचा असतानाच त्याचे आईवडील वेगळे झाले होते. आईने एकटीनेच त्याचा सांभाळ केला. म्हणून तो आईचंच आडनाव लावतो. त्याने वडिलांच्या नावाचा आधार कधीच घेतला नाही.