रुबिना दिलैक-अभिनव शुक्ला जोडीने पटकावलं 'पती पत्नी और पंगा'चं विजेतेपद, मिळाली 'ही' खास गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 09:52 IST2025-11-17T09:44:34+5:302025-11-17T09:52:42+5:30
टेलिव्हिजनवरील लोकप्रिय शो 'पती पत्नी और पंगा'चा ग्रँड फिनाले काल पार पडला. या शोचं विजेतेपद रुबिना दिलैकने पटकावलं आहे

रुबिना दिलैक-अभिनव शुक्ला जोडीने पटकावलं 'पती पत्नी और पंगा'चं विजेतेपद, मिळाली 'ही' खास गोष्ट
कलर्स टीव्हीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो 'पती पत्नी और पंगा' (Pati Patni Aur Panga) चा किताब अभिनेत्री रुबिना दिलैक आणि अभिनेता अभिनव शुक्ला या जोडीने पटकावला आहे. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या या ग्रँड फिनालेमध्ये रुबीना आणि अभिनव यांना विजेतेपद मिळाले. या शोचे सूत्रसंचालन मुनव्वर फारूकी आणि सोनाली बेंद्रे यांनी केले होते.
या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झालेल्या जोडप्यांनी विविध गेम्स आणि टास्कमध्ये भाग घेऊन एकमेकांमधली केमिस्ट्री आणि सुसंवाद सिद्ध करायचा होता. शोमध्ये सहभागी झालेल्या सर्व जोड्यांपैकी रुबिना आणि अभिनव ही या शोमधील चाहत्यांची सर्वाधिक आवडती जोडी ठरली. रुबिना आणि अभिनवला चांदीचे लाडू असलेली खास ट्रॉफी मिळाली.
'बिग बॉस १४' पासून ते 'पती पत्नी और पंगा' पर्यंत रुबिना आणि अभिनव यांचा प्रवास नेहमीच चढ-उतारांनी भरलेला राहिला आहे. 'बिग बॉस १४' मध्ये त्यांनी त्यांच्या नात्यातील समस्या आणि घटस्फोटाच्या विचारांबद्दलही खुलेपणाने चर्चा केली होती. मात्र, आता हे दोघेही त्यांच्या जुळ्या मुली जीवा आणि एधा यांच्यासोबत आनंदी वैवाहिक जीवन जगत आहेत.
विजेत्यांचा आनंद
विजेतेपद मिळाल्यानंतर कलर्स टीव्हीने जारी केलेल्या निवेदनात रुबिना दिलैक आणि अभिनव शुक्ला यांनी आपला आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, "कामाच्या धावपळीशिवाय एकत्र वेळ घालवण्यासाठी 'पती पत्नी और पंगा' हा एक उत्तम मार्ग होता. एक जोडपं म्हणून आम्ही अजिबात परफेक्ट नाही आणि आम्ही इतर जोडप्यांसोबत आमच्यातील उणिवांबद्दलही खुलेपणाने बोललो."
या ट्रॉफीबद्दल ते म्हणाले, "हा विजय खूप खास आहे. प्रेक्षक आणि या संपूर्ण प्रवासात सहभागी असलेल्या प्रत्येकाने दिलेल्या पाठिंब्याचे हे फळ आहे. आम्ही आशा करतो की, आमच्या प्रवासातून लोकांना ही गोष्ट नक्कीच लक्षात राहील की, प्रेमाचा अर्थ केवळ 'परफेक्ट' असणे नाही, तर जेव्हा गोष्टी सर्वात कठीण वाटतात, तेव्हा एकमेकांची साथ द्यावी, असा आहे"
शोमधील इतर जोड्या
रुबिना दिलैक आणि अभिनव शुक्ला यांनी जून २०२१ मध्ये लग्न केले आणि नोव्हेंबर २०२३ मध्ये त्यांना जुळ्या मुली झाल्या. या शोमध्ये रुबिना-अभिनव यांच्यासोबतच गुरमीत चौधरी-देबीना बॅनर्जी, हिना खान-रॉकी जायसवाल, ईशा मालवीय-अभिषेक कुमार, अविका गोर-मिलिंद चांदवानी, सुदेश लहरी-ममता लहरी, स्वरा भास्कर-फहाद अहमद आणि गीता फोगट-पवन कुमार यांसारख्या लोकप्रिय जोड्यांनी भाग घेतला होता. या शोच्या जागी लवकरच 'लाफ्टर शेफ्स सीझन ३' हा कार्यक्रम सुरू होणार आहे.