रोहिणी हट्टंगडी साकारणार पूर्णा आजींची भूमिका; ज्योती चांदेकरांबद्दल म्हणाल्या, "तिच्यासोबत मी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 09:32 IST2025-10-18T09:30:56+5:302025-10-18T09:32:32+5:30
सेटवर आल्या आल्या 'तिने' मला मिठी मारली..., रोहिणी हट्टंगडींची प्रतिक्रिया

रोहिणी हट्टंगडी साकारणार पूर्णा आजींची भूमिका; ज्योती चांदेकरांबद्दल म्हणाल्या, "तिच्यासोबत मी..."
'स्टार प्रवाह'वरील लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग' मध्ये पूर्णा आजी ही भूमिका खूप गाजली होती. अभिनेत्री ज्योती चांदेकरांनी ती भूमिका घराघरात पोहोचवली होती. मात्र काही महिन्यांपूर्वी ज्योती चांदेकर यांचं निधन झालं. सर्वांनाच याचा धक्का बसला होता. पण 'शो मस्ट गो ऑन' म्हणत आता पूर्णा आजींच्या भूमिकेत मालिकेत नवीन अभिनेत्री आली आहे. त्या म्हणजे अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी. कालच त्यांची सेटवर एन्ट्री झाली. अनेकांनी त्या रोहिणी हट्टंगडी असल्याचाच अंदाज लावला होता जो खरा ठरला. रोहिणी हट्टंगडी यांनी एका मुलाखतीत या भूमिकेवर पहिली प्रतिक्रिया दिली आणि ज्योती चांदेकर यांच्याही आठवणी शेअर केल्या.
'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत रोहिणी हट्टंगडी म्हणाल्या, "आज माझ्या मनात जरा संमिश्र भावना आहे. एखाद्या कलाकाराने साकारलेली भूमिका मी पुढे नेणं हे मला वाटतं इतक्या वर्षात मी पहिल्यांदाच करत आहे. ज्योती माझी चांगली मैत्रीण होती. आमचा खूप जास्त संपर्क नव्हता. भेटलो की आम्ही एकमेकींशी बोलायचो. मी लहानपणी बालनाट्यात काम करायचे. ६३-६४ साली मी राज्य नाट्य स्पर्धेत 'सुंदर मी होणार' हे माझं पहिलं मोठं नाटक केलं होतं. त्यात मी बेबी राजे होते आणि ज्योतीने मेनकाची भूमिका केली होती. त्यामुळे तेव्हापासून ती मला माहित होती. नंतरही मी तिचं काम पाहिलं. 'मित्र' मधली तिची भूमिका माझी सर्वात आवडीची होती. खूपच सुंदर केली होती. हे मी तिला सांगितलंही होतं. नंतर आमचा तसा संपर्क आला नाही. एकत्रही काम करण्याचाही योग आला नाही."
त्या पुढे म्हणाल्या, "एखादी भूमिका एखाद्या कलाकाराने साकारलेली असते. लोकांच्या मनात त्याच कलाकाराची इमेज असते. दुसरं कोणीतरी त्या जागी आल्यावर काहींना ते आवडतं तर काहींना आवडत नाही. पण साधारणपणे त्या भूमिकेचा बाज कायम ठेवून अगदी तशीच ती भूमिका होणार नाही कदाचित कुठे कमी जास्त होऊ शकतं. त्यामुळे माझ्या मनात आज संमिश्र भावना आहेत. हे मी पहिल्यांदाच करत आहे. लोकांना आवडेल की नाही हा मोठा प्रश्न मनात आहे. पण मराठी प्रेक्षकांना विचारात घेता आजपर्यंत माझा अनुभव आहे की मराठी प्रेक्षक खूप दिलदार आहेत असं माझं मत आहे. त्यामुळे नक्कीच ते स्वीकारतील. मला खूप आनंद होईल."
"मी सेटवर आल्या आल्या प्राजक्ताने मला मिठी मारली. चार दिवस सासूचे मालिकेत ती माझी सून होती. आता याही मालिकेत सून आहे. मी ही मालिका बघायचे. त्यामुळे मला संवाद बोलताना नावं आठवायला लागतात. पण साधारण गोष्ट मला माहित आहे. म्हणावा तितका त्रास मला झाला नाही. तसंच बाकी कलाकारांबरोबर मी पहिल्यांदाच काम करत आहे. सर्वांनी मला अगदी कुटुंबाप्रमाणेच स्वीकारलं." असंही त्या म्हणाल्या.