"मुलींकडे मन मोकळं करण्यापेक्षा हार्ट अटॅक परवडेल", रघु रामचं महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य, म्हणाला- "पुरुष ६०व्या वर्षी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 18:16 IST2025-11-03T18:16:20+5:302025-11-03T18:16:46+5:30
महिला पुरुषांच्या भावना समजून घेत नसल्याचं म्हटलं आहे. पुरुषांच्या मानसिक आणि शारीरिक आजाराचं मूळ या महिला आहेत, असंही त्याने म्हटलं. महिलांकडे भावना व्यक्त करण्याऐवजी पुरुष हार्ट अटॅकला आनंदाने सामोरे जातील, असं रघु राम म्हणाला.

"मुलींकडे मन मोकळं करण्यापेक्षा हार्ट अटॅक परवडेल", रघु रामचं महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य, म्हणाला- "पुरुष ६०व्या वर्षी..."
रोडिज फेम रघु राम महिलांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. एका पॉडकास्टमध्ये बोलताना त्याने महिला पुरुषांच्या भावना समजून घेत नसल्याचं म्हटलं आहे. पुरुषांच्या मानसिक आणि शारीरिक आजाराचं मूळ या महिला आहेत, असंही त्याने म्हटलं. महिलांकडे भावना व्यक्त करण्याऐवजी पुरुष हार्ट अटॅकला आनंदाने सामोरे जातील, असं रघु राम म्हणाला.
रघु रामने 'टू गर्ल्स अँड टू कप्स' पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने महिलांबद्दल केलेलं वादग्रस्त विधान चर्चेत आलं आहे. तो म्हणाला, "मुली ही सगळ्यात मोठी समस्या आहेत. त्या म्हणतात की त्यांना इमोशनल पुरुष हवे असतात. पण खरं तर त्यांना तसे पुरुष नको असतात. जेव्हा पुरुष एखाद्या स्त्रीसमोर खरंच इमोशनल होतो तेव्हा त्या त्याला तू मुलींसारखा आहेस असं म्हणून नकार देतात. मुलींमुळे मुलं काहीच शेअर करत नाहीत. त्यापेक्षा वयाच्या ६०व्या वर्षी आम्हाला हार्ट अटॅक आलेला चालेल".
पुढे तो म्हणाला, "वयाच्या साठीत फक्त पुरुषांचा हार्ट अटॅकने मृत्यू होतो. कारण जेव्हा आम्ही आमच्या भावना मांडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा स्त्रिया आम्हाला समजूनच घेत नाहीत. त्यामुळे आमच्याकडे काहीच पर्याय राहत नाही. यापेक्षा वाईट काय घडू शकतं? हार्ट अटॅक? बायपास सर्जरी? मग आम्ही त्याला सामोरं जाऊ. मी एखाद्या स्त्रीसमोर स्वत:बद्दल काहीच बोलणार नाही. कारण जेव्हा पुरुष व्यक्त होतात तेव्हा नंतर स्त्रिया त्याच गोष्टी त्याच्याविरुद्ध वापरतात".
"रोडीजमध्ये अशा काही मुली होत्या की त्यांचं बोलणं ऐकून आमच्या कानातून धूर निघाला आणि आम्ही आश्चर्यचकित झालो. मी तर त्यांच्या बोलण्याच्या नोट्स घेत होतो. त्यांचा आवाजाचा टोन आणि भाषा... जेव्हा मुली भांडतात, तेव्हा त्या जेंटलमन नसतात. पुरुष भांडत असले तरी काही मर्यादा पाळतात, पण मुलींच्या भांडणाला मर्यादा नसते. त्या एवढ्या किंचाळतात आणि इतकं टोचून बोलतात की खरंच भीती वाटते", असं मत त्याने व्यक्त केलं.