"हिच्याकडे कोण बघणारे?", 'रात्रीस खेळ चाले' फेम अभिनेत्रीला बारीक म्हणून हिणवलं, सांगितला बॉडी शेमिंगचा अनुभव
By कोमल खांबे | Updated: November 4, 2025 11:33 IST2025-11-04T11:33:31+5:302025-11-04T11:33:57+5:30
'रात्रीस खेळ चाले' फेम अभिनेत्री अश्विनी मुकादमला मात्र बारीक असल्यामुळे बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला होता. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अश्विनीने याबद्दल भाष्य करत अनुभव सांगितला आहे.

"हिच्याकडे कोण बघणारे?", 'रात्रीस खेळ चाले' फेम अभिनेत्रीला बारीक म्हणून हिणवलं, सांगितला बॉडी शेमिंगचा अनुभव
सिनेइंडस्ट्रीत अनेक अभिनेत्रींना बॉडी शेमिंगला सामोरं जावं लागतं. स्लिम ट्रीम अशीच हिरोईन सगळ्यांना हवी असते. त्यामुळे वजन जास्त आणि जाड असलेल्या अभिनेत्रींना अनेकदा बॉडी शेमिंगचा सामना हा करावाच लागतो. पण, 'रात्रीस खेळ चाले' फेम अभिनेत्री अश्विनी मुकादमला मात्र बारीक असल्यामुळे बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला होता. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अश्विनीने याबद्दल भाष्य करत अनुभव सांगितला आहे.
'रात्रीस खेळ चाले', 'सातव्या मुलीची सातवी मुलगी', 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे', 'तुमची मुलगी काय करते' अशा मालिकांमध्ये काम करून ओळख मिळवलेल्या अश्विनी मुकादमने इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत बॉडी शेमिंगचा अनुभव सांगितला. ती म्हणाली, "मी खूप बॉडी शेमिंग सहन केलंय. म्हणजे लोकांना जाड म्हणून चिडवतात. माझं उलट होतं. मी खूप बारीक होते. त्यामुळे काय गं बाई...हे काय आहे काठीला कापड गुंडाळल्यासारखं दिसतं...स्टेजवर ही दिसतच नाही... हिच्याकडे कोण बघणार? हिच्याकडे रोज कोण बघत पण नाही. आज तू बरी दिसत होतीस. एरव्ही तुझ्याकडे कोणी बघतही नाही. अशा सगळ्या कमेंट्स मी ऐकल्या आहेत".
पुढे ती म्हणाली, "त्यावेळी बारीक मुलगी फॅशनमध्ये नव्हतीच. स्लिम ट्रीम हे सौंदर्याचं परिमाणच नव्हतं. प्रत्येकजण आपआपल्या परीने सुंदर असतो. बारीक मुलगी तिच्यापरीने आणि चबी मुलगी तिच्यापरीने सुंदर दिसते, इथपर्यंत आपण येऊन पोहोचलो आहोत. तेव्हा तसा अवेअरनेस नव्हता. प्रत्येकजण माधुरी दीक्षित किंवा सोनाली बेंद्रेसारखं सुंदर नसतं. मला माझ्या मित्रमैत्रिणींनी हेदेखील सांगितलं होतं की असं हिरोईन मटेरियल वगैरे काही नसतं. तुम्हाला ते छान प्रेसेंट करतात आणि तू छान दिसशील. असं काही तू वाटून घेऊ नकोस. पण, आधीपासूनच अगं बाई हिच्या अंगावर मासच नाहीये, इथपासून सगळ्या गोष्टी मी ऐकल्या होत्या. त्यामुळे या मित्रमैत्रिणींकडे दुर्लक्ष केलं. रिव्हर्स बॉडी शेमिंग मी खूप सहन केलं".