"हसतमुख, उत्तम माणूस अन्...", नीना कुलकर्णी, सोनालीसह अनेक कलाकारांनी व्यक्त केल्या भावना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 13:46 IST2025-08-31T13:44:28+5:302025-08-31T13:46:05+5:30
प्रिया मराठेच्या निधनानंतर मनोरंजनसृष्टी हळहळली, शेअर केल्या भावुक पोस्ट

"हसतमुख, उत्तम माणूस अन्...", नीना कुलकर्णी, सोनालीसह अनेक कलाकारांनी व्यक्त केल्या भावना
अभिनेत्री प्रिया मराठेच्या (Priya Marathe) अचानक निधनाने मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. काही वर्षांपूर्वी प्रियाला कर्करोगाने गाठले होते. त्यावर तिने मातही केली होती. मात्र दोन वर्षांपासून तिला पुन्हा त्रास सुरु झाला होता. तिने शर्थीचे प्रयत्न केले मात्र तिची झुंज अखेर अपयशी ठरली. प्रिया बऱ्याच काळापासून मराठी तसंच हिंदी मनोरंजनविश्वात सक्रीय होती. अनेक कलाकारांसोबत तिची मैत्री होती. सर्वांनीच आज या भावुक प्रसंगी सोशल मीडियावरुन भावना व्यक्त केल्या आहेत.
ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी लिहितात, 'प्रिया मराठे...उत्तम कलाकार, उत्तम माणूस, मृदुभाषी आणि हसतमुख..तुझ्याबरोबर जेव्हाही काम केले तेव्हा मला तुझ्यातला उपजत चांगुलपणा जाणवायचा...फार लवकर गेलीस, तुला भावपूर्ण श्रद्धांजली'
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने स्टोरी शेअर करत 'हार्टब्रेकिंग' असे लिहिले आहे. तर अभिनेत्री श्रुती मराठेनेही 'खूपच धक्कादायक' म्हणत श्रद्धांजली वाहिली आहे.
अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने प्रियाचा फोटो शेअर करत लिहिले, 'ही बातमी वाचून मोठा धक्का बसला आहे. खूप खूप दु:खद..भावपूर्ण श्रद्धांजली.'
'तू तिथे मी' मधली प्रिया मराठेची सहकलाकार अभिनेत्री मृणाल दुसानिसनेही पोस्ट शेअर केली आहे. प्रियासोबतचे जुने फोटो पोस्ट करत तिने लिहिले, 'वेडे, तुझी खूप आठवण येत राहील'.
तसेच सई ताम्हणकर, स्पृहा जोशी यांनीही इन्स्टाग्राम स्टोरी शेअर दु:ख व्यक्त केलं आहे.