"शांत-गुणी मुलगी, देव चांगल्या माणसांना का नेतो?" प्रिया मराठेच्या निधनानंतर प्राजक्ता माळीला बसला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 12:10 IST2025-08-31T12:09:11+5:302025-08-31T12:10:56+5:30
प्रिया अशी अचानक सोडून गेल्याचा धक्का चाहत्यांनाही पचवता येत नाही आहे.

"शांत-गुणी मुलगी, देव चांगल्या माणसांना का नेतो?" प्रिया मराठेच्या निधनानंतर प्राजक्ता माळीला बसला धक्का
मराठी मनोरंजन विश्वातील अभिनेत्री प्रिया मराठेचे (Priya Marathe) आज ३१ ऑगस्ट रोजी सकाळी निधन झाले. वयाच्या ३८व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला. कर्करोगाशी लढा अपयशी ठरल्याने अभिनेत्रीची प्राणज्योत मालवली. प्रिया मराठे हिला काही वर्षांपूर्वी कर्करोगाचे निदान झाले. मध्यंतरी ती या दुर्धर आजारातून बरीही झाली होती. मात्र, अलीकडेच तिच्या शरीरात कर्करोग पुन्हा पसरु लागला होता. अखेर आज तिनं जगाचा निरोप घेतला. प्रिया अशी अचानक सोडून गेल्याचा धक्का तिच्या जवळच्या पचवता येत नाहीये. प्रिया मराठेच्या निधनावर अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने शोक व्यक्त केला.
प्राजक्ता माळीने एबीपी माझाशी बोलताना प्रिया मराठेच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं. प्रियाच्या निधनाची बातमी ऐकून प्राजक्ता माळीला मोठा धक्का बसल्याचं तिनं सांगितलं. प्राजक्ता म्हणाली, "बापरे, मला मोठा धक्का बसलाय. कारण, काल परवापर्यंत आमच्यात रमणारी, हसणारी आणि आज ती आपल्यात नाही, हे अजूनही मी पचवतेच आहे". प्राजक्ताने प्रियासोबतच्या आठवणींना उजाळा दिला.
प्राजक्ता म्हणाली, "आम्ही दोघींनी 'एकापेक्षा एक' आणि अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र काम केले होते. प्रिया ही एक गुणी, शांत, अतिशय नम्र आणि सोज्वळ मुलगी होती. ती आपल्या कामाशी काम ठेवायची. तिने कधीच दुसऱ्यांना त्रास दिला नाही. तिला कोणी काही बोललं तरी ती उलट उत्तरही द्यायची नाही. खूप गोड असं तिचं व्यक्तीमत्व होतं. तर देव अशी चांगली माणसं का नेतो, असा प्रश्न मला पडला आहे. खूप सुंदर काम करायची आणि मनापासून काम करायची. कामावर तिचं नितांत प्रेम होतं", असं तिनं म्हटलं.
सोशल मीडियावर पोस्ट शेअर अनेकांनी अभिनेत्रीला श्रद्धांजली अर्पण केली आहे. प्रिया शेवटची स्टार प्रवाहवरील 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत दिसली होती. अभिजीत खांडकेकर मालिकेत मुख्य भूमिकेत होता. तर प्रिया यामध्ये मोनिका कामत ही भूमिका साकारत होती. काही महिन्यांपूर्वी प्रियाने मालिका सोडल. गेल्या वर्षी आलेल्या सुबोध भावेच्या 'तू भेटशी नव्याने' या मालिकेतही प्रिया खलनायिकेच्या भूमिकेत होती.