"शेजाऱ्यांशी बोलताना मागून ड्रेसला लागली आग, अभिनेत्रीला...", ऐन दिवाळीत घडली दुर्घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 10:39 IST2025-10-22T10:35:42+5:302025-10-22T10:39:06+5:30
खांद्याला, पाठीला भाजलं; दिवाळीत अभिनेत्रीसोबत घडली मोठी दुर्घटना

"शेजाऱ्यांशी बोलताना मागून ड्रेसला लागली आग, अभिनेत्रीला...", ऐन दिवाळीत घडली दुर्घटना
'बिग बॉस ९'फेम प्रिया मलिकसोबत काल दिवाळीला दुर्घटना घडली. यातून ती थोडक्यात वाचली. दिवाळीला सगळीकडे पणत्यांची आरास असताना प्रिया मलिकचे केस आणि कपड्यांना चुकून आग लागली. तिच्या वडिलांनी समयसूचकता दाखवून तिचा जीव वाचवला. या घटनेनंतर प्रिया काही वेळ धक्क्यातच होती. तिने सोशल मीडियावर संपूर्ण घटनाक्रम सांगितला.
प्रिया मलिक कुटुंब आणि शेजाऱ्यांसोबत दिवाळी साजरी करत होती. याचवेळी तिने घातलेले कपडे मागे असलेल्या जळत्या पणतीच्या संपर्कात आले आणि आग भडकली. इन्स्टाग्रामवर तिने ही भयावह घटना सांगितली आहे. ती लिहिते, "मी माझ्या शेजाऱ्यांसोबत फोटो काढत होते. काही कळायच्या आत मला माझ्या उजव्या खांद्याजवळ आगीचा भडकला दिसला. नंतर मला कळलं की माझी पूर्ण पाठ जळत आहे आणि मी अक्षरश: आगीच्या ज्वाळांच्या संपर्कात होते. ही काही छोटी मोठी आग नव्हती. नशीब माझे वडिलांनी आग लागलेला कपड्यांचा भाग लगेच फाडला. कारण त्यातून वाचण्याचा हा एकच मार्ग होता. मात्र या घटनेमुळे मला आणि माझ्या कुटुंबाला मोठा धक्का बसला."
ती पुढे लिहिते, "जिथे प्रत्येक जण फायर सेफ्टीबद्दल बोलतो आणि विचार करतो की अशा दुर्घटना त्यांच्यासोबत कधीही होऊ शकत नाही. तेव्हाच काल रात्री मला याची जाणीव झाली की थोडं दुर्लक्ष जीवावर बेतू शकतं. तेव्हा माझे वडील तिथे होते म्हणून बरं. आता मी ठीक आहे. माझ्या खांद्याला, पाठीला आणि बोटांना किरकोळ भाजलं आहे. फार मोठं नुकसान न होता मी नशिबाने वाचले. पण या घटनेने मला कायमचं धक्क्यात टाकलं आहे."
या घटनेवेळी प्रियाचा मुलगा तिच्याजवळ नव्हता. मुलांना कडेवर घ्याल तेव्हा जास्त खबरदारी घ्यायला हवी हेही तेव्हाच समजलं असं प्रिया म्हणाली. ही दुर्घटना प्रियाला आयुष्यभरासाठी धडा देऊन गेली.