"मी स्वत:ला भाग्यवान समजतो...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये घरवापसी केल्यानंतर ओंकार भोजनेची पहिली प्रतिक्रिया
By कोमल खांबे | Updated: October 20, 2025 14:38 IST2025-10-20T14:37:01+5:302025-10-20T14:38:54+5:30
ओंकार 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये पुन्हा परतत आहे. त्यामुळे चाहत्यांना आनंदाचा सुखद धक्का बसला आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये घरवापसी केल्यानंतर ओंकारने प्रतिक्रिया दिली आहे.

"मी स्वत:ला भाग्यवान समजतो...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये घरवापसी केल्यानंतर ओंकार भोजनेची पहिली प्रतिक्रिया
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय मालिकेतून ओंकार भोजनेला त्याचं टॅलेंट दाखवत घराघरात पोहोचण्याची संधी मिळाली. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील चाहत्यांच्या आवडत्या कलाकारांपैकी ओंकारदेखील एक होता. पण, अचानक त्याने हास्यजत्रेतून एक्झिट घेतली होती. त्यामुळे त्याचे चाहतेही नाराज झाले होते. मात्र आता काही वेळानंतर ओंकार 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये पुन्हा परतत आहे. त्यामुळे चाहत्यांना आनंदाचा सुखद धक्का बसला आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये घरवापसी केल्यानंतर ओंकारने प्रतिक्रिया दिली आहे.
ओंकारने राजश्री मराठीशी बोलताना 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये परत येण्याबद्दल त्याच्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला, "मी खूप जास्त उत्सुक आहे आणि तितकंच दडपणही आहे. कारण आता तेच काम त्याच एनर्जीने पुन्हा करायचं आहे. टीमची खूप छान भट्टी जमलीये. आणि कितीही नाही म्हटलं तरी मी थोडा मागे पडलोय. कितीतरी सेमिस्टर माझ्या राहिल्या आहेत. त्या पूर्ण करायच्या आहेत. ती मजा मला नव्याने अनुभवता येणारे. प्रेक्षकांचा इतका चांगला प्रतिसाद आणि पाठिंबा असल्यामुळे मला तो विश्वास आहे आणि मी नक्कीच चांगला प्रयत्न करेन".
"माझ्या रुटीनमध्ये रात्री ९ वाजता हास्यजत्रा बघायचो. कुठल्या एपिसोडमध्ये काय आहे हे मी एपिसोड नंबर सहित सांगू शकतो इतकं ते मी फॉलो करायचो. त्यामुळे एक प्रेक्षक म्हणून माझ्या रुटीनचा तो भाग आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ओंकार परत आला म्हणून जो काय प्रेक्षकांना आनंद होतोय. तर मलाही तितकाच आनंद आहे. कारण इतक्या मोठ्या मंचाने, वाहिनीने इतक्या मोठ्या प्रकारे वेलकम करणं आणि प्रेक्षकांनी सगळ्याला पाठिंबा देणं हे फिलिंग वेगळं आहे. या दोन्ही सरांनी कॉमेडीची वेगळी फळी उभी केलीय. दुर्देवाने उपहासात आपल्याला जास्त विनोद शोधावा लागतोय. पण, हरकत नाही. तोही मिळून एन्जॉय करुया. कलाकार म्हणून इतक्या मोठ्या मंचाचा भाग असणं ही जमेची आणि उर्जेची बाजू आहे. आणि मला ती मिळते यासाठी स्वत:ला भाग्यवान समजतो", असंही ओंकार म्हणाला.