अजित पवारांच्या बायोपिकमध्ये कोणता अभिनेता भूमिका साकारणार? निलेश साबळे म्हणाला- "त्यांनी सांगितलं की..."
By कोमल खांबे | Updated: July 15, 2025 12:10 IST2025-07-15T12:10:03+5:302025-07-15T12:10:28+5:30
'चला हवा येऊ द्या'चं सूत्रसंचालन करत निलेश साबळेने अख्ख्या महाराष्ट्राचं मनं जिंकलं होतं. अनेक सेलिब्रिटींच्या नकला करण्यासोबतच काही राजकीय नेत्यांची मिमिक्रीही साबळे हुबेहुब करायचा.

अजित पवारांच्या बायोपिकमध्ये कोणता अभिनेता भूमिका साकारणार? निलेश साबळे म्हणाला- "त्यांनी सांगितलं की..."
"हसताय ना हसायलाच पाहिजे" असं म्हणत निलेश साबळेने संपूर्ण महाराष्ट्राला खळखळवून हसवलं. आता 'चला हवा येऊ द्या'चं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण, या पर्वात निलेश साबळे दिसणार नाहीये. 'चला हवा येऊ द्या'चं सूत्रसंचालन करत निलेश साबळेने अख्ख्या महाराष्ट्राचं मनं जिंकलं होतं. अनेक सेलिब्रिटींच्या नकला करण्यासोबतच काही राजकीय नेत्यांची मिमिक्रीही साबळे हुबेहुब करायचा.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही नक्कल डॉक्टर करायचा. म्हणूनच आपला बायोपिक आला तर निलेश साबळेनेच माझी भूमिका साकारावी अशी इच्छा अजित पवारांनी व्यक्त केली होती. निलेश साबळेने नुकतीच लोकशाही या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तो म्हणाला, "अजित पवार साहेब जेव्हा झीच्या मंचावर आले होते. तेव्हा त्यांना अवधूत गुप्तेने प्रश्न विचारलेला की तुमच्यावर बायोपिक आला तर कोणी केला पाहिजे. त्यावर ते म्हणाले होते की डॉक्टरने केला पाहिजे. त्याआधी दादांची आणि माझी थेट भेट झाली नव्हती. मी बॅकस्टेजला होतो. त्यांनी मला बोलवून घेतलं. मी स्टेजवर गेलो तर ते मला म्हणाले की तुम्ही छान करता पण त्या ठिकाणी तुम्ही इतके वेळा बोलता जेवढे वेळा मी बोलत नाही. या मोठ्या व्यक्ती असतात. पण त्या विनोदाला विनोदाप्रमाणे घेतात तेव्हा बरं वाटतं".
'चला हवा येऊ द्या'चं नवं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यामध्ये निलेश साबळेच्या जागी अभिजीत खांडकेकर सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. एका सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी असल्याने निलेश साबळेने 'चला हवा येऊ द्या'मधून एक्झिट घेतली आहे.