"मी एक मोठा सिनेमा करतोय...भाऊ कदम अन् 'हा' अभिनेता दिसणार"; निलेश साबळेचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 11:33 IST2025-07-15T11:32:41+5:302025-07-15T11:33:19+5:30

'चला हवा येऊ द्या' नाही पण दुसराच एक भव्य शो करणार

nilesh sabale revealed he is directing a big cinema starring bhau kadam and onkar | "मी एक मोठा सिनेमा करतोय...भाऊ कदम अन् 'हा' अभिनेता दिसणार"; निलेश साबळेचा खुलासा

"मी एक मोठा सिनेमा करतोय...भाऊ कदम अन् 'हा' अभिनेता दिसणार"; निलेश साबळेचा खुलासा

'चला हवा येऊ द्या' या शोला वेगळ्या उंचीवर नेऊन पोहोचवणारा सूत्रसंचालक डॉ निलेश साबळे (Nilesh Sabale) सध्या चर्चेत आहे. हवा येऊ द्या चं नवीन पर्व लवकरच येणार आहे. मात्र या पर्वात निलेश साबळे दिसणार नाही म्हणून चाहत्यांची निराशा झाली आहे. निलेश सध्या एका सिनेमाच्या कामात व्यग्र आहे म्हणूनच त्याने शोला नकार दिला. आता नुकतंच आगामी सिनेमाबद्दल निलेशने माहिती दिली. 

'लोकशाही'ला दिलेल्या मुलाखतीत निलेश साबळे म्हणाला, "चला हवा येऊ द्या च्या नव्या पर्वाबाबत माझं चॅनलशी बोलणं झालं होतं. आमची एक मीटिंगही झाली होती. पण सध्या मी एक सिनेमा दिग्दर्शित करतोय. तो बऱ्यापैकी मोठा सिनेमा आहे. त्यात खूप कलाकार आहेत. भाऊ सुद्धा त्या सिनेमात आहे. सिनेमाचं चित्रीकरण अजून दीड महिना चालेल. त्यामुळे तारखा जुळणं कठीण झालं होतं. हा शो आता लगेच लाँचही होतोय.त्यामुळे आमचं शक्य झालं नाही. शोचा आता नवीन वेगळा फॉर्मॅटही होता. त्यासाठी खूप वेळ द्यावा लागणार होता. म्हणून आत्ता आम्ही या पर्वात नाहीये. सिनेमात  भाऊसोबत ओंकारही आहे. तसंच आमच्या टीमव्यतिरिक्तही दिग्गज कलाकारांची फौज आहे. साधारण डिसेंबर-जानेवारीपर्यंत सिनेमा येईल. हे एक मोठं प्रोजेक्ट आहे. त्यातून आम्हा सगळ्यांची वेगळी बाजू प्रेक्षकांना बघायला मिळेल." 

तो पुढे म्हणाला, "एका शोचीही तयारी करतोय. मात्र त्याविषयी आत्ता काहीच उलगडता येणार नाही. तो एक भव्यदिव्य शो असणार आहे. त्याची लवकरच घोषणा होईल."

२०१४ ते २०२४ असे दहा वर्ष 'चला हवा येऊ द्या'ने सर्वांचं मनोरंजन केलं. यानंतर निलेश साबळे फारसा कुठे दिसला नाही. काही दिवसांपूर्वी राशीचक्राकार शरद उपाध्येंनी त्याच्यावर आरोप केल्याने तो चर्चेत आला. निलेशने आरोपांवर व्हिडिओ शेअर रोखठोक उत्तर दिलं होतं.

Web Title: nilesh sabale revealed he is directing a big cinema starring bhau kadam and onkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.