"नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन...", विधानभवनात पडळकर-आव्हाडांचे कार्यकर्ते भिडल्यानंतर मराठी अभिनेत्याचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 11:14 IST2025-07-18T11:13:34+5:302025-07-18T11:14:30+5:30
गुरुवारी विधानभवनातच जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या संपूर्ण प्रकारानंतर मराठी अभिनेत्याने पोस्ट शेअर करत नेत्यांना टोला लगावला आहे.

"नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन...", विधानभवनात पडळकर-आव्हाडांचे कार्यकर्ते भिडल्यानंतर मराठी अभिनेत्याचा टोला
गेल्या २-३ दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात शाब्दिक खटके उडत होते. याचा परिणाम म्हणजे गुरुवारी विधानभवनातच दोघांचेही कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विधानभवनातच हा प्रकार घडल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या संपूर्ण प्रकारानंतर मराठी अभिनेत्याने पोस्ट शेअर करत नेत्यांना टोला लगावला आहे.
अभिनेता सुव्रत जोशीने या संपूर्ण प्रकरणानंतर इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे. "आज एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावरुन अत्यंत परिपक्वरित्या विधानसभेत लोकशाही पद्धतीने विचारविनिमय केलेल्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन", असं म्हणत सुव्रत जोशीने ही खोचक पोस्ट शेअर केली आहे.
नेमका वाद काय?
काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी विधान भवनाच्या परिसरात गोपिचंद पडळकर यांना मंगळसूत्र चोर म्हणून डिवचल्यानंतर या वादाला सुरुवात झाली होती. त्यानंतर काल गोपिचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड आमने सामने आले असता दोन्हीकडून एकमेकांना शिविगाळ करून धमकावण्यात आले होते. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याला जिवे मारण्याची धमकी आल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते विधान भवनाच्या आवारातच एकमेकांना भिडल्याने या वादाने गंभीर वळण घेतलं आहे.