"बघ की इकडेss असं म्हणत शिट्टी वाजवून त्यांनी..."; 'नवरी मिळे हिटलरला' फेम अभिनेत्रीसोबत छेडछाड
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 09:05 IST2025-09-03T09:03:13+5:302025-09-03T09:05:35+5:30
'नवरी मिळे हिटलरला' फेम अभिनेत्रीसोबत छेडछाड झाल्याची गोष्ट समोर आली आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर ही घटना सर्वांना सांगितली आहे

"बघ की इकडेss असं म्हणत शिट्टी वाजवून त्यांनी..."; 'नवरी मिळे हिटलरला' फेम अभिनेत्रीसोबत छेडछाड
सध्या गणेशोत्सवाची धामधुम सगळीकडे सुरु आहे. रात्री उशीरापर्यंत मुंबईकर जागे असून ते बाप्पाची सेवा करताना दिसतात. पण अशाच वातावरणात विचित्र मानसिकतेची माणसंही वावरताना दिसतात. 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्रीला अशाच माणसांचा त्रास झाल्याचं चित्र समोर येतंय. अभिनेत्रीने सोशल मीडियावर याविषयी पोस्ट लिहिली असून तिचा संताप व्यक्त केला आहे. काय घडलंय नेमकं?
'नवरी मिळे हिटलरला' मालिकेतील अभिनेत्रीसोबत छेडछाड
'नवरी मिळे हिटलरला' मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री आलापिनीने ही घटना सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना सांगितली आहे. ''३ टू व्हिलर्स आणि सहा मुलं गाडी चालवताना सातत्याने बोलत होते. रस्त्याच्या मधोमध गाडी चालवताना त्यांचा हा प्रकार सुरु होता. मी त्यांना ओव्हरटेक केलं. त्यानंतर ते हॉर्न वाजवणार हे मला माहित होतं. बघ की इकडे, ये पाव्हणी असं म्हणत त्यांनी शिट्टी वाजवली. मी मागे वळले तेव्हा काही झालंच नाही अशा आविर्भावात ते पुढे गेले. मी घरी आले आणि किती वेळ बाप्पासमोर बसलेय, मला माहित नाही.''
अशाप्रकारे आलापिनीने तिच्यासोबत घडलेली घटना सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितली आहे. आलापिनीने ही घटना सांगताच अनेकांनी तिला धीर दिला आहे. याशिवाय ज्या मुलांनी हे कृत्य केलं त्यांच्याविरोधात संताप व्यक्त केलाय. 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेतून आलापिनीला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. याच मालिकेतील मुख्य अभिनेत्री वल्लरी विराजसोबत आलापिनीने डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. आलापिनी अभिनेत्री आणि उत्कृष्ट नृत्यांगना आहे.