"जे घडलं ते वाईट होतं...", स्मृती-पलाशच्या लग्नाला गेलेला प्रसिद्ध अभिनेता, नक्की काय झालं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 12:53 IST2026-02-05T12:53:00+5:302026-02-05T12:53:57+5:30
पलाश-स्मृतीचं लग्न का मोडलं? अभिनेता म्हणाला...

"जे घडलं ते वाईट होतं...", स्मृती-पलाशच्या लग्नाला गेलेला प्रसिद्ध अभिनेता, नक्की काय झालं?
स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांचं लग्न मोडल्याची चर्चा अजूनही सुरुच आहे. गेल्या वर्षी २३ नोव्हेंबर रोजी सांगली येथे दोघांचं धुमधडाक्यात लग्न होणार होतं. संगीत, मेहंदी हे फंक्शन्सही झाले. मात्र ऐन लग्नाच्या आदल्या रात्रीच राडा झाला. नक्की काय घडलं हे बाहेर आलं नाही. स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडल्याचं आधी सांगण्यात आलं. नंतर पलाशही रुग्णालयात असल्याचं समोर आलं. काही दिवसांनी पलाशने स्मृतीला लग्नाच्या आदल्या रात्रीच धोका दिल्याची बातमी आली आणि एकच खळबळ माजली. खूप बातम्या पसरल्या. पलाशच्या लग्नाला गेलेला त्याचा मित्र जो प्रसिद्ध अभिनेता आहे त्याने आता या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
हा अभिनेता आहे नंदिश संधू. 'मिस मालिनी'ला दिलेल्या मुलाखतीत नंदिश म्हणाला, "मला प्रामाणिकपणे असं वाटतं आत्ता आपण त्या गोष्टीवर काहीच न बोललेलं बरं. पलाशला त्याची बाजू मांडायची संधी द्यायला हवी. नक्की काय घडलं याचं कारण मला माहित नाही. त्यामुळे मी त्यावर काही कमेंट करु शकत नाही. मी त्यांच्या लग्नाला गेलो होतो. पण ते लग्न होऊ शकलं नाही. जे बातम्यांमध्ये आलं की स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडली, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं म्हणून लग्न पुढे ढकलण्यात येत आहे हेच आम्हालाही तिथे सांगण्यात आलं होतं. नंतर मलाही बातम्यांमधूनच इतर गोष्टी कळल्या. पण मी त्यावर काहीही बोलणं योग्य नाही. कारण मला नक्की काय घडलं ते माहितच नाही."
तो पुढे म्हणाला, "पण खरं सांगायचं तर मला खूप वाईट वाटतंय. जे काय कारण असेल पण त्यांचं लग्न होऊ शकलं नाही हे वाईट झालं. गेल्या ५-६ वर्षांपासून त्या दोघांचं एकमेकांवर वेड्यासारखं प्रेम होतं जे मी पाहिलं आहे. मी जेव्हा केव्हा त्यांना भेटायचो ते एकदम क्युट कपल वाटायचे. पण जे झालं ते खूप वाईट होतं. एक मित्र म्हणूनही हे सगळं बघून आपण गोंधळतो तेच माझंही झालं."
नंदिश संधू 'उतरन' मालिकेतून लोकप्रिय झाला होता. नंतर तो काही वेबसीरिजमध्ये दिसला. काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या 'तस्करी'मध्येही त्याची भूमिका होती. तर आता तो 'फॅमिली बिझनेस' या नेटफ्लिक्स ओरिजनल सीरिजमध्ये दिसणार आहे.