माझं लेकरू घरी परतलं! ओंकार भोजनेसोबत पुन्हा तेच स्किट; नम्रता संभेरावने केली भावुक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 15:22 IST2026-01-15T15:21:35+5:302026-01-15T15:22:21+5:30
नम्रता संभेरावने ओंकार आणि प्रसाद खांडेकरसोबतचा फोटो शेअर केला आहे.

माझं लेकरू घरी परतलं! ओंकार भोजनेसोबत पुन्हा तेच स्किट; नम्रता संभेरावने केली भावुक पोस्ट
महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमाचा नवा सीझन ५ जानेवाीरपासून सुरु झाला. समीर चौघुले, वनिता खरात, नम्रता संभेराव, प्रियदर्शिनी इंदलकर, प्रसाद खांडेकर, शिवाली परब असे सगळेच कलाकार प्रेक्षकांना पुन्हा हसवायला सज्ज झाले आहेत. विशेष म्हणजे हास्यजत्रा सोडून गेलेला एक भिडू काही महिन्यांपूर्वीच शोमध्ये परतला आहे. तो म्हणजे सर्वांचा लाडका ओंकार भोजने. नम्रता आणि प्रसाद खांडेकरसोबत ओंकार भोजनेचे स्किट्स खूप गाजले. आता हे त्रिकुट एवढ्या वर्षांनी एकत्र आलं आहे. ओंकार भोजनेसाठी नम्रता संभेरावने भावुक पोस्ट लिहिली आहे.
नम्रता संभेरावने ओंकार आणि प्रसाद खांडेकरसोबतचा फोटो शेअर केला आहे. त्यांच्या गाजलेल्या स्किटमधलाच हा फोटो आहे. नम्रता लिहिते, "अगं अगं आई sssssss अरे माझ्या लेकरा sssss खरंच आमचे कान आसुसले होते हे ऐकायला. जेव्हा प्रहसन चालू होतं आणि ओंकारचे अगं अगं आई हे शब्द कानावर पडले तेव्हा खरंच कंठ दाटून आला . डोळ्यात पाणी आलं. आमचं तुमचं सगळ्यांचं माझ्या ह्या लेकरावर नितांत प्रेम आहे . आणि आपल्या सगळ्यांची हाक अखेर लेकराला ऐकू आली आणि लेकरू परत घराकडे परतलं . माझं लेकरू परत आलं . आता त्याला नेमका काय छंद जडलाय कुठे उड्डाण घ्यायचीय हे पाहायचं असेल तर महाराष्ट्राची हास्यजत्रा नक्की बघा."
'आम्ही पण वाट बघत होतो लेकराची, आम्हालाही आवडतं अगं अगं आई ऐकायला', 'वेलकम बॅक ओंकार' अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. नव्या सीझनमध्ये ओंकारच्या येण्याने शोची रंगत द्विगुणित झाली आहे. ओंकारला आता कोणता नवा छंद जडलाय आणि तो आपल्या विनोदाने कोणती नवीन उड्डाणे घेणार, हे पाहण्यासाठी रसिक प्रेक्षक उत्सुक आहेत. महाराष्ट्राची हास्यजत्रा केवळ एक शो नसून ते एक कुटुंब झाले आहे हेच नम्रताच्या या पोस्टमधून सिद्ध होतं.