शाब्बास रे पठ्ठ्यांनो! नागपूरच्या गंधे ब्रदर्सनी कोरलं 'MasterChef India' च्या ट्रॉफीवर नाव, बक्षीस म्हणून मिळाली तब्बल 'इतकी' रक्कम
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 10:02 IST2026-03-07T10:01:15+5:302026-03-07T10:02:00+5:30
Master Chef India 9 Finale: 'मास्टरशेफ इंडिया' सीझन ९ ची ट्रॉफी नागपूरच्या दोन भावांनी जिंकली आहे.कोण आहेत गंधे ब्रदर्स जाणून घेऊया...

शाब्बास रे पठ्ठ्यांनो! नागपूरच्या गंधे ब्रदर्सनी कोरलं 'MasterChef India' च्या ट्रॉफीवर नाव, बक्षीस म्हणून मिळाली तब्बल 'इतकी' रक्कम
Master Chef India 9 Finale: 'मास्टरशेफ इंडिया' हा टीव्हीवरील सर्वाधिक लोकप्रिय शो आहे. देशातच्या कानाकोपऱ्यातून आलेले असे अनेक होम शेफ 'मास्टरशेफ इंडिया' च्या किचनमध्ये पाककला सादर करताना दिसतात. पारंपरिक पदार्थांना मॉर्डन टच देण्यावर या स्पर्धकांचा कल असतो. नुकताच या शोच्या नवव्या पर्वाचा ग्रॅंड फिनाले मोठ्या दिमाखात पार पडला. अनेका कारणांमुळे चर्चेत असलेल्या शोच्या विजेतापदाचा दावेदार कोण होणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं होतं. या पर्वाची मास्टरशेफ इंडिया ट्रॉफी नागपूरच्या विक्रम आणि अजिंक्य गंधे या मराठमोळ्या तरुणांनी उंचावली आहे. सध्या अजिंक्य आणि विक्रमवर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
दरम्यान,विक्रम आणि अजिंक्य गंधेने मास्टरशेफ इंडियामध्ये आपल्या कुकिंग स्किल्सनं अनेकांची मनं जिंकली होती. या पर्वात नागपुरच्या या तरुणांनी त्यांच्या अतुलनीय टीमवर्क आणि पारंपारिक गोष्टींवर भर देत त्याला आधुनिक देत त्यांचं वेगळेपण सिद्ध केलं. प्रसिद्ध शेफ विकास खन्ना, रणवीर ब्रार आणि कुणाल कपूर हे या सीझनचे परीक्षक होते. 'मास्टरशेफ'चे विजेते ठरलेल्या गंधे ब्रदर्सला बक्षीस स्वरुपात २५ लाख रुपये धनादेश आणि ट्रॉफी देण्यात आली. तसेच दोघांना 'Golden Apron' देखील दिला आहे. विशेष म्हणजे 'मास्टरशेफ इंडिया'च्या अंतिम पर्वात प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांनी देखील हजेरी लावली होती.
'मास्टरशेफ इंडिया'चा नववा सीझन जानेवारीमध्ये सुरू झाला. पहिल्यांदाच, स्पर्धक जोडीने दिसले, जिथे कुटुंबातील सदस्य एकत्र स्पर्धा करण्यासाठी जोड्या बनवल्या गेल्या. विक्रम आणि अजिंक्य व्यतिरिक्त, अंतिम फेरीत बहिणी अंजू प्रधान आणि मंजू ओझा आणि आई-मुलीची जोडी चंदना आणि साई श्री राचकोंडा यांचाही समावेश होता.
कोण आहेत गंधे ब्रदर्स?
महाराष्ट्रातील अजिंक्य गंधे आणि विक्रम गंधे यांनी "मास्टरशेफ इंडिया" ची ट्रॉफी जिंकून राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवली आहे. ३१ वर्षीय विक्रमने नागपुरातील सिटी प्रीमियर कॉलेजमधून वाणिज्य शाखेचे शिक्षण घेतलं आहे, तर २९ वर्षीय अजिंक्यने नागपूरमधून आर्किटेक्चरमध्ये पदवी घेतली आहे. दोन्ही भावांना स्वयंपाकाची खूप आवड आहे.
विक्रम गंधे हा अनेक वर्षांपासून त्यांच्या फॅमिली बिझनेसला हातभार लावत होता. मात्र, कोरानानंतर सगळी परिस्थिती बदलली. त्यानंतर गंधे ब्रदर्सनी आपली आवड लक्षात घेऊन स्वत: चा कॅफे सुरु केला. ज्यामुळे ते देशातील सर्वात मोठ्या स्वयंपाक व्यासपीठावर पोहोचले.