भयंकर! बायकांना टॉयलेटला जाता आलं नसेल...पुणे-मुंबई वाहतुक कोंडीवर मराठी अभिनेत्रीची पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 16:57 IST2026-02-05T16:55:57+5:302026-02-05T16:57:20+5:30
मराठी अभिनेत्रीची संतप्त पोस्ट, नेटकऱ्यांच्या कमेंट्स

भयंकर! बायकांना टॉयलेटला जाता आलं नसेल...पुणे-मुंबई वाहतुक कोंडीवर मराठी अभिनेत्रीची पोस्ट
महाराष्ट्रातला सर्वात मोठा पुणे-मुंबई महामार्ग आणि त्यावर वाहतुकीची तब्बल २४ तासांहूनही अधिक काळ कोंडी झाली होती. महामार्गावर एके ठिकाणी टँकर पलटी झाल्याने ही वाहतुक कोंडी झाली ज्याला प्रवाश्यांना तोंड द्यावं लागलं. यात काही विद्यार्थीही अडकले होते ज्यांना परीक्षेला वेळेत पोहोचता आलं नाही. तर वृद्ध, महिला, लहान मुलांसह अनेक नागरिक या कोंडीत अडकले. सोशल मीडियावर अनेकांनी संताप व्यक्त केला. एका मराठी अभिनेत्रीने लिहिलेली संतप्त पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.
लेखिका, अभिनेत्री मुग्धा गोडबोलेने फेसबुकवर मोठी पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला. ती लिहिते, "भयंकर आहे.. .गेली तीस वर्ष मी सातत्याने हा प्रवास करते आहे. वेगवेगळ्या वाहनांमधून करते आहे. बस, ट्रेन, टॅक्सी, गाडी यापैकी त्या त्या वेळी जे सोयीचं असेल ते. सुरुवातीला 5-6 तास लागायचे. मध्ये कधीतरी तो ' द्रुतगती ' झाला. यात सातत्य इतरही गोष्टीत आहे. टोलची रक्कम वाढणे. वाढत जाणे. पण रस्ता तितका चांगला न राहणे. चालकांनी नियम न पाळणे. त्याबद्दल कुणीही काहीही न करणे. कधीही कोणतीही सूचना न देता लेन बंद असणे. घाटात ट्रॅफिक जॅम असणे. ट्रक्स आणि टेम्पोने तीनही लेन्स ब्लॉक करून ठेवणे."
ती पुढे लिहिते, "गेले दोन दिवस पुणेमुंबई द्रुतगती मार्गावर जे झालं आहे हे अक्षम्य आहे. रस्त्याचे पदर वाढवायचे म्हणून टोल वाढवायचा. तरीही हे असं कसं होतं?? बायकांना टॉयलेटला जाता आलं नसेल. गाडीत लहान मुलं, म्हातारी माणसं, आजारी माणसं, गरोदर बायका असतील. लोकांच्या visa appointments गेल्या, विमानं चुकली, प्रचंड आर्थिक नुकसान झालं. हे वेळीच थांबवता आलं नसतं का? निर्णय घेऊन डॅमेज कमी करता आला नसता का? याला कोण जबाबदार आहे??"
मुग्धाच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यांचे अनुभव सांगितले. राग व्यक्त केला. अभिनेते शरद पोंक्षेंनेही कमेंट करत लिहिले, 'भयंकर कडक शिक्षा जो पर्यंत होत नाहीत.शिक्षेची भिती बसत नाही तो पर्यंत हे असंच चालणार सर्वच क्षेत्रात'. महत्वाचं म्हणजे टँकर पलटी झाला आहे तर याची पूर्वकल्पनाही दिली गेली नाही. आधीच दुसऱ्या रस्त्यावरुन जाण्याबाबत नागरिकांना सुचवलं गेलं नाही अशी खंत अनेकांनी व्यक्त केली आहे.