इंस्टाग्राम फॉलोअर्स कमी झाल्यामुळे होती नैराश्यात, मीशा अग्रवालच्या कुटुंबीयांनी केला धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 17:02 IST2025-04-30T17:01:58+5:302025-04-30T17:02:29+5:30
मीशा अग्रवालच्या मृत्यूचं ६ दिवसांनंतर गूढ उलगडले आहे. मिशाच्या कुटुंबीयांनी तिच्या मृत्यूबाबत मोठा खुलासा केला आहे.

इंस्टाग्राम फॉलोअर्स कमी झाल्यामुळे होती नैराश्यात, मीशा अग्रवालच्या कुटुंबीयांनी केला धक्कादायक खुलासा
Misha Agarwal Suicide: प्रसिद्ध रीलस्टार मिशा अग्रवालनं वाढदिवसाच्या दोन दिवस आधी म्हणजेच २४ एप्रिल रोजी जगाचा निरोप घेतला होता. मीशाचा २६ एप्रिल रोजी वाढदिवस होता. मीशाच्या अचानक निधनाने तिच्या चाहत्यांना धक्का बसला. २६ एप्रिल रोजी तिच्या वाढदिवशी त्यांच्या कुटुंबियांनी एका पोस्टद्वारे तिच्या मृत्यूची माहिती चाहत्यांना दिली होती. मात्र, त्यावेळी तिच्या मृत्यूचं कारण उघड झालं नव्हतं. आता मिशाच्या कुटुंबातील एका सदस्यानं निवेदन जारी करत तिच्या मृत्यूबाबत मोठा खुलासा केला आहे.
मीशा अग्रवाल ही स्टाग्राम फॉलोअर्स कमी झाल्यामुळे अत्यंत नैराश्यात गेली होती. १ मिलियन फॉलोअर्स मिळवण्याचं तिचं ध्येय होतं. पण, फॉलोअर्समध्ये घट होत असल्यानं ती स्वता:ला अपयशी समजू लागली. आज ३० एप्रिल रोजी मीशा अग्रवालच्या इंस्टाग्राम हँडलवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली. ज्यात कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "तिच्या फोनच्या वॉलपेपरनं सर्व काही सांगितलं. तिच्या आयुष्यात फक्त एकच ध्येय होतं. कृपया हे समजून घेण्याचा प्रयत्न करा की इंस्टाग्राम हे खरे जग नाही आणि फॉलोअर्सचं प्रेम खरं नाही. माझ्या धाकट्या बहिणीने तिचे संपूर्ण जग इंस्टाग्राम आणि तिच्या फॉलोअर्सभोवती फिरत होतं. १० लाख फॉलोअर्स मिळवणे आणि लोकांचं प्रेम जिंकणं हेच फक्त एकच तिचं स्वप्न होतं. पण, जेव्हा तिचे फॉलोअर्स कमी होऊ लागले तेव्हा ती खूप अस्वस्थ झाली आणि स्वतःला अपयशी समजू लागली. एप्रिलपासून ती खूप नैराश्यात होती".
पोस्टमध्ये पुढे लिहलेलं आहे, "ती अनेकदा मला मिठी मारून रडायची आणि म्हणायची 'माझे फॉलोअर्स कमी झाले तर मी काय करेन? माझी करिअर संपेल'. मी तिला समजावून सांगितलं होतं की हे तिचं संपूर्ण जग नाही, हा फक्त एक साइड जॉब आहे. मी तिला तिच्याकडे एलएलबी पदवी आणि पीसीएस ची तयारी बद्दल आठवण करुन दिली. मी तिला सांगितलं की ती एक दिवस न्यायाधीश होईल आणि तिला तिच्या करिअरची काळजी करण्याची गरज नाही. मी तिला सांगितलं की इंस्टाग्रामकडे फक्त मनोरंजनाचं साधन म्हणून बघा आणि तुझं जीवन बनवू नको. मी तिला आनंदावर लक्ष केंद्रित करण्याचा आणि नैराश्य, चिंता यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. पण दुर्दैवाने, माझ्या धाकट्या बहिणीने माझं ऐकलं नाही. ती इंस्टाग्राम आणि फॉलोअर्समध्ये इतकी हरवली की ती आम्हाला कायमची सोडून गेली. दुर्दैवाने, ती इतकी अस्वस्थ झाली की तिने स्वतःचा जीव घेतला".
मीशाच्या कुटुंबीयांकडून करण्यात आलेल्या या पोस्टमधून तिच्या मृत्यूचं कारण स्पष्ट झालं आहे. दरम्यान, सोशल मीडियामुळे मानसिक आरोग्यावर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रभाव पडतो. सकारात्मक बाजू म्हणजे संवाद आणि माहिती मिळणे, तर नकारात्मक बाजू म्हणजे व्यसन, चिंता आणि नैराश्य. योग्य वापर आणि जागरूकता वाढवून, आपण सोशल मीडियाचा मानसिक आरोग्यासाठी फायद्यासाठी वापर करू शकतो. त्यामुळे जर तुम्हाला चिंता किंवा नैराश्य जाणवत असेल, तर मानसिक आरोग्य तज्ञांची मदत घ्या.