"मला सहानुभूती नको होती...", मराठीनंतर अचानक हिंदीत काम करण्यावर मयुरी देशमुखचं वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 16:56 IST2025-12-06T16:55:39+5:302025-12-06T16:56:57+5:30
मराठीनंतर हिंदीत जाणं अगदीच अचानक घडलं. कारण...

"मला सहानुभूती नको होती...", मराठीनंतर अचानक हिंदीत काम करण्यावर मयुरी देशमुखचं वक्तव्य
मराठी अभिनेत्री मयुरी देशमुख 'खुलता कळी खुलेना' मालिकेत दिसली. या मालिकेने तिला लोकप्रिय बनवलं. ती घराघरात पोहोचली. यानंतर मयुरी अगदीच मोजक्या भूमिकांमध्ये दिसली. 'डिअर आजो' हे नाटक तिने लिहिलं होतं आणि लिहिलंही होतं. मयुरी लेखिकाही आहे. दरम्यान लॉकडाऊन काळात मयुरीवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. त्यातून बाहेर पडण्यासाठी तिला हिंदी मालिकेची मदत झाली होती. कारण मयुरी मराठीनंतर थेट हिंदी मालिकेत दिसली होती. या प्रवासाबद्दल तिने सांगितलं आहे.
मित्रम्हणेला दिलेल्या मुलाखतीत मयुरी देशमुख म्हणाली, "मराठीनंतर हिंदीत जाणं अगदीच अचानक घडलं. कारण मी हिंदीसाठी अजिबातच प्रयत्न करत नव्हते. सुरुवातीला मी जेव्हा ऑडिशन्सला जायचे तेव्हा काश्मिरी, पंजाबी गोऱ्या गोमट्या मुली तिथे असायच्या. त्याल मला असं खाली पाहायच्या. त्यांचा आत्मविश्वास तर विचारुच नका..माझ्यासारख्या सावळ्या मुलीला तिकडे काहीच स्कोप नाही असं मला वाटायचं. त्यांना पाहून माझा आत्मविश्वास निघून जायचा."
ती पुढे म्हणाली, "खुलता कळी खुलेना मुळे माझं मराठीतलं करिअर सुरु झालं. लॉकडाऊनमध्ये मला अचानक फोन आला. तेव्हा मी काम करण्याच्या मन:स्थितीत नव्हते. पण मला तो फोन कॉल खूप आवडला. कारण ते खूप प्रोफेशनली माझ्याशी बोलत होते. त्यांना मयुरी देशमुख कोण आहे हे माहितच नव्हतं. ते माझ्याशी एका नवीन माणसाशी बोलतो त्या पद्धतीने बोलत होते. तर तेव्हाच मराठीत माझ्याशी लोक खूप सांभाळून बोलायचे. सहानुभूती दाखवायचे. मला तो सूर नकोसा वाटत होता. सहानुभूती नको होती. मग इथे हिंदीत मला फ्रेश झोन वाटला. इथे आपल्याला कोणी ओळखत नाही. काहीही संबंध नाही. त्यांनी मला ऑडिशन पाठवायला लावलं. मी खरं तर ते टाळत होते. पण अभिज्ञा भावेने मला ऑडिशन द्यायला भाग पाडलं. मी पाठवलं आणि माझी निवडही झाली. माझाच विश्वास बसेना. मी नंतर दिग्दर्शकाला विचारलं की तुम्ही मला का निवडलं? तर ते म्हणाले की 'तुझ्या आधी एक मुलगी फायनल झाली होती. पण तुझं ऑडिशन मी पाहिलं आणि मला वाटलं की तूच 'मालिनी' आहेस. तेव्हा तुझं हिंदी नीट नव्हतं, त्यात थोडे मराठी उच्चार जाणवत होते. पण मला वाटलं हे सुधारु शकू पण ती मालिनी मला त्या एका ऑडिशनमधून तुझ्यातच दिसली'. त्या मालिकेचा प्रवास खूप खास होता. त्याने मला एक वेगळाच आत्मविश्वास दिला. त्याच प्रवासात मी माझ्या दु:खातून सावरले."
मयुरी देशमुख 'इमली' या हिंदी मालिकेत दिसली होती. या मालिकेत तिची मालिनी त्रिपाठी ही निगेटिव्ह भूमिका होती. गेल्या वर्षीच ही मालिका संपली. आता मयुरी 'सविता दामोदर परांजपे' या नाटकात दिसणार आहे.