मोरे कुटुंब पुन्हा एकत्र; 'सहकुटुंब सहपरिवार' घेणार खंडेरायाचं दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 15:21 IST2022-06-07T15:19:18+5:302022-06-07T15:21:02+5:30
Sahakutumb Sahaparivar: यळकोट यळकोट जय मल्हार असा जयघोष करत संपूर्ण कुटुंबाने पारंपरिक पद्धतीने सर्व विधी पूर्ण करत खंडेरायाला साकडं घातलं आहे.

मोरे कुटुंब पुन्हा एकत्र; 'सहकुटुंब सहपरिवार' घेणार खंडेरायाचं दर्शन
छोट्या पडद्यावर अल्पावधीत लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे सहकुटुंब सहपरिवार. उत्तम कथानक आणि त्याला साजेसा कलाकारांचा अभिनय यामुळे ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेत मोरे कुटुंबात अनेक चढउतार आल्याचं पाहायला मिळालं. ज्योतीच्या येण्यामुळे संपूर्ण मोरे कुटुंब विखुरलं होतं. परंतु, आता सरुने मोरेंच्या घरात पुन्हा गृहप्रवेश केल्यानंतर हळूहळू ही विस्कटलेली घडी बसत आहे. त्यामुळेच आता संपूर्ण मोरे कुटुंबीय सहकुटुंब सहपरिवार जेजुरीला खंडेरायाच्या दर्शनासाठी जाणार आहेत.
जेजुरीचा खंडोबा म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. 'यळकोट यळकोट जय मल्हार' असा जयघोष करत आणि भंडारा उधळत हजारो भाविक खंडोबाच्या दर्शनसाठी येतात. 'स्टार प्रवाह'वरील सहकुटुंब सहपरिवार' मालिकेतील संपूर्ण मोरे कुटुंब जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनाला जाणार आहेत.
खरंतर गेल्या काही दिवसांपासून मोरे कुटुंब बऱ्याच अडचणींचा सामना करत आहे. नेहमी गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या या कुटुंबाला जणू कुणाची दृष्ट लागली आणि आपापसातील गैरसमज वाढत गेले. कुटुंबावर ओढावलेलं हे अरिष्ट दूर व्हावं यासाठीच सर्वांनी मिळून जेजुरीला जायचं ठरवलं आहे. १२ जूनच्या महाएपिसोडमध्ये सहकुटुंब सहपरिवारच्या कलाकारांसोबत प्रेक्षकांना खंडेरायाचा महादर्शन सोहळा अनुभवता येईल.
यळकोट यळकोट जय मल्हार असा जयघोष करत संपूर्ण कुटुंबाने पारंपरिक पद्धतीने सर्व विधी पूर्ण करत खंडेरायाला साकडं घातलं आहे. गडाच्या पायऱ्या चढण्याचा विधीही या कुटुंबाने पूर्ण केला आहे. पश्याने अंजीला तर वैभवने अवनीला उचलून गडाच्या पायऱ्या चढल्या आहेत. हा सीन पूर्ण करताना सर्वांचीच तारेवरची कसरत झाली. मात्र जिद्दीने संपूर्ण टीमने हा सीन पूर्ण केला.