'कोण होतीस तू काय झालीस तू' मालिकेत 'या' लोकप्रिय अभिनेत्रीची वर्णी; साकारणार लक्षवेधी भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 13:01 IST2025-04-02T13:00:26+5:302025-04-02T13:01:57+5:30
छोट्या पडद्यावरील मालिकांचा प्रेक्षकवर्ग हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

'कोण होतीस तू काय झालीस तू' मालिकेत 'या' लोकप्रिय अभिनेत्रीची वर्णी; साकारणार लक्षवेधी भूमिका
Sakshi Gandhi New Serial: छोट्या पडद्यावरील मालिकांचा प्रेक्षकवर्ग हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या मालिका जणू प्रेक्षकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत चालल्या आहेत. अलिकडेच पार पडलेल्या 'स्टार प्रवाह परिवार' पुरस्कार सोहळ्याला एका नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली. या मालिकेचं नाव आहे ‘कोण होतीस तू काय झालीस तू’आहे. त्यामुळे या मालिकेबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. दरम्यान, कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेत एक लोकप्रिय चेहरा झळकणार आहे. या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री साक्षी गांधी पुन्हा स्टार प्रवाहवर कमबॅक करते आहे.
'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेतून साक्षी गांधी घराघरात पोहोचली. या मालिकेत तिने साकारलेलं अवनी नावाचं पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. गेल्या दोन वर्षांपूर्वी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. सध्या ती 'नवी जन्मेन मी' मालिकेत पाहायला मिळते. त्यानंतर आता नव्या मालिकेतून साक्षी तिच्या चाहत्यांच्या भेटीला येत आहे. कोण होतीस तू काय झालीस तू मध्ये ती नकारात्मक भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे.
'कोण होतीस तू काय झालीस तू' या नव्याकोऱ्या मालिकेत मंदार जाधव आणि गिरिजा प्रभू मुख्य भूमिकेत आहेत. त्याचबरोबर वैभव मांगले, अमृता माळवदकर आणि अमित खेडेकर यांच्यासह सुकन्या मोने, साक्षी गांधी अशी तगडी स्टार कास्ट दिसणार आहे. यश आणि कावेरीची जोडी आता पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. येत्या २८ एप्रिलपासून ही मालिका प्रसारित केली जाणार आहे.