'रंग माझा वेगळा' फेम अभिनेत्री 'झी मराठी' च्या नव्या मालिकेत झळकणार, पोस्ट शेअर करत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 12:13 IST2025-02-18T12:09:00+5:302025-02-18T12:13:45+5:30
'झी मराठी वाहिनी' नव्या वर्षात काही नव्या मालिकांचा खजिना घेऊन आली आहे.

'रंग माझा वेगळा' फेम अभिनेत्री 'झी मराठी' च्या नव्या मालिकेत झळकणार, पोस्ट शेअर करत म्हणाली...
Tanishka Vishe: 'झी मराठी वाहिनी' नव्या वर्षात काही नव्या मालिकांचा खजिना घेऊन आली आहे. अलिकडेच या वाहिनीवर लक्ष्मी निवास ही मालिका सुरु करण्यात आली. या मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. त्यानंतर आता लवकरच झी मराठीवर एक नवीकोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'लक्ष्मी निवास' या कौटुंबिक मालिकेनंतर 'तुला जपणार आहे' ही एक थ्रिलर मालिका सुरू होणार आहे.दरम्यान, या मालिकेत अभिनेत्री प्रतीक्षा शिवणकर, महिमा म्हात्रे, मिलिंद पाठक, निलेश रानडे, शर्वरी लोहकरे, सिद्धीरुपा कर्माकर आणि बालकलाकार अधिकी कसबे अशी तगडी स्टारकास्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. याशिवाय 'तुला जपणार आहे' मध्ये आणखी एक ओळखीचा चेहरा दिसणार आहे.
"दिसत नसले तरी असणार आहे...'तुला जपणार आहे", असे या मालिकेच्या शीर्षकगीताचे बोल आहेत. या आगामी मालिकेत रंग माझा वेगळा फेम अभिनेत्री तनिष्का विशे झळकणार आहे. तुला जपणार आहे मालिकेत तनिष्काने 'अनन्या' नावाचं पात्र साकारणार आहे. सोशल मीडियावर अभिनेत्रीने तिच्या आगामी मालिकेबद्दल माहिती देत खास पोस्ट शेअर केली आहे. "अनन्याला भेटा..., आजपासून सोमवार ते शनिवार रात्री १०: ३० वाजता. आपल्या झी मराठीवर...", अशी पोस्ट तिने शेअर केली आहे. हुशार, समंजस आणि घरात सगळ्यांची लाडकी - अनन्या! अशा भूमिकेत ती दिसणार आहे.
तनिष्का विशेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर तिने याआधी 'रंग माझा वेगळा' या मालिकेत काम केलं आहे. कार्तिक-दीपाची मुलगी दीपिकाच्या भूमिकेत ती झळकली होती. रंग माझा वेगळा मध्ये अभिनेत्री साकारलेली दीपिका इनामदारची भूमिका आजही अनेकांच्या लक्षात आहे. आता ही अभिनेत्री पुन्हा एकदा नव्या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. त्यामुळे तनिष्का या मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी होईल का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.