"मला अनेक प्रोजेक्टमधून बाहेर काढलं, कारण...", गौरव मोरेने सांगितली इंडस्ट्रीची काळी बाजू, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 14:35 IST2025-07-18T14:27:05+5:302025-07-18T14:35:20+5:30
"खरं बोलायला गेलो की लोकांचे इगो हर्ट होतात", गौरव मोरे असं का म्हणाला?

"मला अनेक प्रोजेक्टमधून बाहेर काढलं, कारण...", गौरव मोरेने सांगितली इंडस्ट्रीची काळी बाजू, म्हणाला...
Gaurav More: विनोदाचं अचूक टायमिंग साधत प्रेक्षकांना खळखळून हसवणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजेच गौरव मोरे (Gaurav More). 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामुळे गौरव घराघरात पोहोचला. आता हा विनोदवीर मराठीसह हिंदी कलाविश्वात काम करताना दिसत आहे. लवकरच तो 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यानिमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत गौरव मोरेने त्याच्या मनातील खंत व्यक्त केली.
अलिकडेच गौरव मोरेने 'महाराष्ट्र टाईम्स' ला मुलाखत दिली. त्यादरम्यान अभिनेत्याने त्याला या अभिनय प्रवासात आलेले अनुभव शेअर केले. त्याविषयी बोलताना गौरव मोरे म्हणाला, "माझी एक गोष्ट आहे मी खरं बोलायला जातो त्यामुळे काही लोकांचे इगो हर्ट होतात. मग मला प्रोजेक्टमधून काढून टाकलं जातं किंवा मीच जातो. मला कळतं की आता हा दरवाजा आपल्यासाठी बंद झालाय मग मी दुसरा दरवाजा उघडतो पण तिथेही तेच होतं. मग मला कळतं की आपण 'हा जी हा जी' , 'सर सर' करत नाही, म्हणून आपण मागे आहोत. पण याचा एक मला फायदा वाटतो की मी जेव्हा स्वतःला आरशात बघतो तेव्हा मला स्वतःकडे बघताना माझी लाज वाटत नाही. की मी सर, सर करुन कामं मिळवली. अनेकदा याला काम देऊ नका म्हणून फोन केले जातात. त्यामुळे अशा अनेक प्रोजेक्ट मधून मला बाहेर काढलं."
त्यानंतर पुढे गौरव म्हणाला, "माझी तुम्ही किती कामं थांबवणार यात तुमचं अपयश आहे माझं नाही. ती त्यांची वृत्ती आहे. कोणीतरी असेलच ज्याला माझ्यासोबत काम करायचं आहे. मला खोटं हसता येत नाही, खोट्या मिठ्या मारता येत नाही, मला खोटं 'कसा आहेस?' असं बोलता येत नाही आणि इंडस्ट्रीत सध्या हे खूप चाललंय." असा खुलासा करत अभिनेत्याने इंडस्ट्रीतील वास्तव सांगितलं आहे.