अरुंधतीचा अपमान करणं अभिला पडणार महागात; चारचौघात आशुतोष लगावणार कानशिलात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 16:25 IST2022-04-29T16:25:13+5:302022-04-29T16:25:44+5:30
Aai kuthe kay karte:अभिषेकचं हे वागणं पाहून आशुतोषला प्रचंड संताप येतो. तसंच चारचौघांमध्ये त्याने अरुंधतीच्या चारित्र्यावर उडवलेले शिंतोडे पाहून रागाच्या भरात आशुतोष त्याच्यावर हात उगारतो.

अरुंधतीचा अपमान करणं अभिला पडणार महागात; चारचौघात आशुतोष लगावणार कानशिलात
एका सर्वसामान्य गृहिणीची कथा उत्तमरित्या सादर करणारी लोकप्रिय मालिका म्हणजे आई कुठे काय करते. ही मालिका सुरु झाल्यापासून त्यात येणारे चढउतार प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत. सध्या या मालिकेत पुन्हा एक रंजकदार वळण आल्याचं दिसून येत आहे. ज्या संजनासाठी अनिरुद्धने अरुंधतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला त्याच संजनाला आता तो कंटाळला आहे. इतकंच नाही तर संजनाच्या या रोजच्या कटकटीला घरातील प्रत्येक जण वैतागला आहे. तर दुसरीकडे अरुंधती आणि आशुतोष यांच्यातील मैत्री खुलत आहे. परंतु, ही मैत्री अनिरुद्ध, कांचन आणि अभिषेक यांना मुळीच मान्य नाही. त्यामुळे ते सतत या गोष्टीवर तिचा अपमान करत असतात. मात्र, अरुंधतीचा हाच अपमान करणं अभिला महागात पडणार आहे.
अनिरुद्धने संजनासोबत केलेलं लग्न अभिला मान्य आहे. मात्र, अरुंधतीची आशुतोषसोबत होत असलेली मैत्री त्याला अजिबात पटलेली नाही. त्यामुळे त्याने यापूर्वीही अनेकदा अरुंधतीचा अपमान केला आहे. मात्र, यावेळी त्याने भर रेस्टॉरंटमध्ये तिचा अपमान केला. ज्यामुळे आशुतोषचा पारा चढतो आणि तो अभिवर हात उचलतो.
सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये अभि त्याच्या मित्रांसोबत एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेला असतो. याच वेळी त्या रेस्टॉरंटमध्ये अरुंधती आणि आशुतोषदेखील असतात. त्यामुळे या दोघांना एकत्र पाहून अभिचे मित्र त्याची खिल्ली उडवतात. त्यामुळे संतापलेला अभि त्यांच्यावर हात उगारतो. इतकंच नाही तर तो अरुंधतीजवळ जात तिलाही खरंखोटं सुनावतो.
दरम्यान, अभिषेकचं हे वागणं पाहून आशुतोषला प्रचंड संताप येतो. तसंच चारचौघांमध्ये त्याने अरुंधतीच्या चारित्र्यावर उडवलेले शिंतोडे पाहून रागाच्या भरात आशुतोष त्याच्यावर हात उगारतो. त्यामुळे आता या मालिकेत पुढे काय होणार? अरुंधती अभिला कशाप्रकारे समजावणार? की, त्याच्याशी अबोला धरणार? अरुंधती- आशुतोषची मैत्री पुढे कायम राहणार का? अशा कितीतरी प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना ही मालिका पाहिल्यावर मिळणार आहेत.