"हो, मला लग्न करायचंय", तेजश्रीने सांगितल्या जोडीदाराच्या अपेक्षा, म्हणाली- "आयुष्यभर साथ देणारा..."
By कोमल खांबे | Updated: December 16, 2024 14:21 IST2024-12-16T14:20:15+5:302024-12-16T14:21:41+5:30
सिनेमातील भूमिका, लग्नसंस्था, मॅट्रीमोनियल साइट्स याबद्दल बोलताना तेजश्रीने दुसरं लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. या मुलाखतीत तिने जोडीदाराच्या अपेक्षाही सांगितल्या.

"हो, मला लग्न करायचंय", तेजश्रीने सांगितल्या जोडीदाराच्या अपेक्षा, म्हणाली- "आयुष्यभर साथ देणारा..."
'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री तेजश्री प्रधान हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. 'तुझं नि माझं घर श्रीमंताचं', 'लेक लाडकी ह्या घरची', 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकांमधून अभिनयाचा ठसा उमटवलेली तेजश्री सध्या प्रेमाची गोष्ट मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. अनेक नाटक आणि सिनेमांमध्येही तिने काम केलं आहे. आता तेजश्री 'हॅशटॅग तदेव लग्नम' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाच्या निमित्ताने तिने 'लोकमत फिल्मी'शी खास संवाद साधला.
तेजश्रीने या मुलाखतीत दिलखुलास गप्पा मारल्या. सिनेमातील भूमिका, लग्नसंस्था, मॅट्रिमोनियल साइट्स याबद्दल बोलताना तेजश्रीने दुसरं लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. या मुलाखतीत तिने जोडीदाराच्या अपेक्षाही सांगितल्या. "हो मला लग्न करायचं आहे. मला आवडेल असा आणि भावेल असा जोडीदार भेटला तर मी निश्चितच लग्न करेन. जेवढे आपण पुढे जातो, तशा अपेक्षा कमी होत जातात. एक सच्चा, कमिटमेंट पाळणारा आणि आयुष्यभर साथ देणारा, आपण त्याची जबाबदारी आहोत, असं माणणारा कोणी भेटलं तर मला लग्न करायला नक्कीच आवडेल", असं तेजश्री म्हणाली.
तेजश्रीने २०१४ साली अभिनेता शशांक केतकरसोबत लग्न केलं होतं. 'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेत त्यांनी एकत्र काम केलं होतं. तेजश्री आणि शशांकची जोडीही प्रेक्षकांना भावली होती. पण, लग्नानंतर अवघ्या वर्षभरातच त्यांचा घटस्फोट झाला. २०१५ साली घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळे झाले.
दरम्यान, तेजश्री मुख्य भूमिकेत असलेला 'हॅशटॅग तदेव लग्नम' हा सिनेमा २० डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात अभिनेता सुबोध भावे मुख्य भूमिकेत आहे. तर आनंद गोखले यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.