"ते मनापासून बोलले, म्हणूनच..."; मराठी अभिनेत्री मेघा धाडेचा महेश कोठारेंना पाठिंबा, म्हणाली-
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 12:31 IST2025-10-23T12:27:28+5:302025-10-23T12:31:28+5:30
Megha Dhade Support Mahesh Kothare: बिग बॉस मराठीची विजेती मेघा धाडेने महेश कोठारेंना पाठिंबा दिला आहे. अत्यंत स्पष्ट शब्दात मेघाने तिचं मत व्यक्त केलंय

"ते मनापासून बोलले, म्हणूनच..."; मराठी अभिनेत्री मेघा धाडेचा महेश कोठारेंना पाठिंबा, म्हणाली-
काही दिवसांपूर्वी महेश कोठारेनी भाजपाला जाहीर पाठिंबा दिला. दिवाळीनिमित्त भारतीय जनता पार्टीने आयोजित एका कार्यक्रमात महेश कोठारे सहभागी झाले होते. त्यावेळी मी मोदी भक्त असून, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचे कमळ फुलणार असल्याचं विधान केलं होतं. त्यानंतर शिवसेनेचे संजय राऊत आणि इतर राजकीय व्यक्तींनी महेश कोठारेंवर टीका केली. पण आता अभिनेत्री मेघा धाडेने महेश कोठारेंची बाजू घेत त्यांना समर्थन दिलं आहे.
मेघा धाडे सोशल मीडियावर पोस्ट करुन म्हणाली की, ''अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने उध्दव सेना जॉइन केली होती तेव्हा कोणत्याही भाजप प्रवक्त्याने तिच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर आक्षेप घेतला नव्हता ! सुप्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकरने तर मनसेच्या तिकिटावर लोकसभा लढवली होती तरी कोणी आक्षेप घेतला नाही ! परंतु महेश कोठारेंनी मोदींची तारीफ केली की उध्दव सेनेला इंगळ्या डसल्या ! कोठारेंवर टीकेची झोड उठवली गेली ! त्यांच्या मराठीपणावर देखील शंका घेण्यात आली !''
''हे असे झाले कारण कोठारे जे बोलले ते मनापासून बोलले कोणत्या तिकीटाच्या लालसेपोटी, कोणाचे पाकीट मिळवण्यासाठी ते असे बोलले नाही एक सामान्य मुंबईकरांची जी भावना आहे जो मुंबईकर आधी रस्त्यावर धक्के खायचा तो आता मेट्रोत गार वाऱ्यात वेगाने प्रवास. करतोय जो मुंबईकर आधी ट्रॅफिक मध्ये अडकायचा आता तो अटल सेतूवरून सुसाट धावतोय त्या मुंबईकरांच्या भावनांचे प्रगटीकरण कोठारेंच्या भाषणात झाले आणि म्हणूनच उध्दव सेनेच्या पायाखालची जमीन सरकली! आणि हे सत्यात देखील उतरणार आहे.''
काय म्हणाले होते महेश कोठारे?
महेश कोठारे भाजप आयोजित दिवाळी कार्यक्रमात म्हणाले की, "हा कार्यक्रम आपल्या घरचा आहे. भाजप म्हणजे आपलं घर आहे, कारण मी स्वतः भाजपचा भक्त आहे. मी पंतप्रधान मोदींचा भक्त आहे. "पुढच्या वर्षीच्या दिवाळीच्या कार्यक्रमापर्यंत मुंबईवर कमळ फुललेलं असेल याची मला गॅरंटी आहे. आपल्याला नगरसेवक निवडून द्यायचा आहे, पण यावेळचा महापौरही इथून निवडून गेलेला असेल," अशा शब्दात महेश कोठारे यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं होतं.