'असंभव' मालिका का सोडलेली? मानसी साळवीचा खुलासा; म्हणाली, "प्रेग्नंसीत काळी जादू..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 16:02 IST2025-03-16T16:00:52+5:302025-03-16T16:02:04+5:30
इतक्या वर्षांनंतर मानसी साळवीने सांगितलं कारण

'असंभव' मालिका का सोडलेली? मानसी साळवीचा खुलासा; म्हणाली, "प्रेग्नंसीत काळी जादू..."
अभिनेत्री मानसी साळवी (Manasi Salvi) म्हटलं की 'दिस चार झाले मन' हे गाणं आठवतंच. मानसी गेल्या काही वर्षांपासून हिंदी मालिकांमध्ये लोकप्रिय चेहरा आहे. मात्र मूळ मराठमोळी असलेल्या मानसीने अनेक मराठी मालिका, सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्यातलीच एक म्हणजे सर्वात गाजलेली 'असंभव' ही मालिका. हो, तुम्हाला आठवत असेल तर 'असंभव' मध्ये पहिले काही एपिसोड्स मानसी साळवी मुख्य भूमिकेत होती. पण तिने नंतर मालिका का सोडली? याचं उत्तर मानसीने नुकतंच दिलं आहे.
'आरपार'ला दिलेल्या मुलाखतीत मानसी म्हणाली, "असंभव मालिकेत काम करताना मी गरोदर राहिले. ती मालिका अतिशय गूढ होती. त्यात काळी जादू वगरे गोष्टी होत्या. प्रेग्नंसीत माझ्यासमोर अशा बाहुल्या वगरे मला बघायचं नव्हतं. तसंच घाबरण्याचा अभिनय जरी कधीतरी वरवरचा वाटत असला तरी तो अनेकदा आपल्या मनातूनही असतो. आपण काहीतरी बघून जेव्हा अगदी मनातून घाबरलोय असं दाखवतो ते सगळं मला गरोदरपणात करायचं नव्हतं. कारण मला वाटलं ते माझ्या बाळासाठी धोकादायक असू शकतं."
ती पुढे म्हणाली, "तरी मला पल्लवी जोशी तेव्हा म्हणाली होती की आम्ही तुझ्या भूमिकेला प्रेग्नंट असल्याचं दाखवू. तू मालिका सोडू नको. काळजी करु नको. पण मला ते करायचं नव्हतं. मी इतके वर्षांपासून काम करत होते. मला माझा गरोदरपणाचा काळ एन्जॉय करायचा होता. मला पुस्तकं वाचायची होती. मी ७ वर्षांची असल्यापासून मला वडिलांनी सहस्त्रनाम, सुक्तम हे सगळं शिकवलं आहे. तर मला ते तेव्हा गरोदरपणात बोलायचं होतं. म्हणून मी असंभव मालिका सोडली."
'असंभव' ही मराठी मालिकांच्या इतिहासातील सर्वात गाजलेली मालिका आहे. २००७ साली आलेल्या या मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं होतं. रहस्य, गूढ अशी ही मालिका होती. अभिनेत्री मानसी साळवी मालिका शुभ्रा या भूमिकेत होती. तर उमेश कामत आदिनाथ या मुख्य भूमिकेत होता. मानसीने १०० एपिसोड्स केल्यानंतर मालिका सोडली. नंतर तिच्या जागी अभिनेत्री उर्मिला कानिटकरने शुभ्राची भूमिका साकारली.