'बिग बॉस' फेम जान्हवी किल्लेकरची 'या' लोकप्रिय मालिकेत एन्ट्री; प्रोमो आला समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 16:31 IST2025-01-14T16:29:01+5:302025-01-14T16:31:33+5:30
अभिनेत्री जान्हवी किल्लेकर स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिकेत दिसणार आहे.

'बिग बॉस' फेम जान्हवी किल्लेकरची 'या' लोकप्रिय मालिकेत एन्ट्री; प्रोमो आला समोर
Jahnavi Killekar: स्टार प्रवाह वाहिनीवरील 'अबोली' ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय असलेल्या मालिकांपैकी एक आहे. अभिनेता सचित पाटील आणि गौरी कुलकर्णी यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. दरम्यान, टीआरपीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी मालिकाविश्वात वेगवेगळे प्रयोग केल्याचे पाहायला मिळतात. अशातच सोशल मीडियावर नुकताच 'अबोली' मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. या मालिकेत आता 'बिग बॉस' फेम जान्हवी किल्लेकरची एन्ट्री झाल्याची पाहायला मिळते आहे. मालिकेत जान्हवी एका लेडी इन्स्पेक्टरच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
स्टार प्रवाह वाहिनीने सोशल मीडियावर 'अबोली' मालिकेचा धमाकेदार प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये दिसतंय की, पहिल्यांदा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस एका मुलीची चुकीच्या पद्धतीने चौकशी करताना दिसत आहे. त्यावेळी ती मुलगी फरफटत जाऊन माठातील पाणी घेण्यासाठी जात असते. त्याच दरम्यान समोरुन कोणीतरी नेमकं पाण्याने भरलेला माठावर तांब्या फेकून मारतं आणि त्यामुळे तो माठ फुटतो. तिथेच दीपशिखा भोसले पाटीलची एन्ट्री होते. पुढे ती मुलगी चौकशीदरम्यान बोलत नसल्यामुळे दीपशिखा हातात पट्टा घेऊन तिला मारायला जाणार तितक्यात अबोली येते आणि तिच्या हातातील पट्टा एका हाताने धरते.
पुढे अबोली म्हणते, "अंकुश सरांच्या पोलीस स्टेशनमध्ये इन्ट्रॉगेशनची (चौकशी) ही पद्धत नाही." त्यावर उत्तर देताना दीपशिखा म्हणते आता ही अंकुशची नाही तर इन्स्पेक्टर दीपशिखा भोसले पाटीलची चौकी आहे. त्यावर अबोली इन्स्पेक्टर दीपशिखला बजावते आणि म्हणते कोणाचाही असो जो कायद्याला जुमानणार नाही त्याला ही अबोली वकिलीचा हिसका दाखवणार. अबोली मालिकेचा हा धमाकेदार प्रोमो नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे.