"मला हा चमत्कार वाटला...", सिद्धिविनायकाच्या दर्शनाचा अनुभव सांगताना मिलींद गवळी भारावले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 13:02 IST2025-04-17T12:56:22+5:302025-04-17T13:02:28+5:30

अभिनेते मिलींद गवळी हे त्यांच्या कामासह तसेच सोशल मीडियावरील पोस्टमुळे सातत्याने चर्चेत येतात.

marathi actor zhapuk zhupuk fame milind gawali shared his experience of visiting siddhivinayak temple video viral | "मला हा चमत्कार वाटला...", सिद्धिविनायकाच्या दर्शनाचा अनुभव सांगताना मिलींद गवळी भारावले 

"मला हा चमत्कार वाटला...", सिद्धिविनायकाच्या दर्शनाचा अनुभव सांगताना मिलींद गवळी भारावले 

Milind Gawali: अभिनेते मिलींद गवळी (Milind Gawali) हे त्यांच्या कामासह तसेच सोशल मीडियावरील पोस्टमुळे सातत्याने चर्चेत येतात. 'आई कुठे काय करते' मालिकेनंतर ते आता नव्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. केदार शिंदे दिग्दर्शित 'झापुक झुपूक' सिनेमाच्या माध्यमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. येत्या २५ एप्रिलला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. अशातच नुकताच त्यांनी सोशल मीडियावर खास व्हिडीओ पोस्ट केला आहे. 'झापुक झुपूक' चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी मिलींद गवळी सपत्नीक गणरायाच्या चरणी नतमस्तक झाले आहेत. नुकतीच मुंबईतील सिद्धीविनायक मंदिराला भेट देत बाप्पाचं दर्शन घेतलं आहे. 


आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर सुंदर व्हिडीओ शेअर करत मिलींद गवळींनी म्हटलंय, "प्रत्येक गोष्टीचा योग घ्यावा लागतो, योग्य वेळी सगळ्या गोष्टी घडत असतात, परमेश्वराच्या आशीर्वादाशिवाय झाडाचं एकही पान हलत नाही, गेल्या अनेक वर्षात माझं सिद्धिविनायक गणपती बाप्पाचं दर्शन झालं नाही, आणि गेल्या चार दिवसांमध्ये दोन वेळा अतिशय सुंदर दर्शन झालं, काही दिवसापूर्वी "झापुक झुपूक" सिनेमाच्या Trailer launch च्या दिवशी, आम्ही सगळे सिनेमातले कलाकार सिद्धिविनायक गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला गेलो, तिथे दर्शन घेत असताना मनात विचार आला की माझ्या पत्नीला म्हणजे दिपाला सिद्धिविनायकाची खूप ओढ आहे, तर आमचं इतका सुंदर दर्शन झालं ते खरंतर तिचं पण व्हायला हवं होतं. मी तिला घेऊन यायला हवं होतं, मी मनात म्हटलं एक दिवस तिला बाप्पाच्या दर्शनाला नक्की घेऊन येईन आणि अगदी दोन दिवसांनी प्रतीक गायकवाड नावाच्या गृहस्थाचा मला फोन आला, म्हणाला की सिद्धिविनायकाच्या आरतीला तुम्ही याल का? मला हा चमत्कार वाटला, मी त्याला म्हटलं हो मला नक्की आवडेल यायला, मी सह-पत्नी येईन आरतीसाठी. आणि काल संकष्टीच्या दिवशी, सिद्धिविनायक मंदिराच्या गाभाऱ्यात मी आणि दिपा जवळजवळ दोन तास होतो, गणपती बाप्पाची सुंदर पूजा अर्चा, छान आरती झाली, सगळं अनुभवायला मिळालं. बाप्पाकडून एक वेगळीच ऊर्जा घेऊन घरी आलो."

पुढे त्यांनी लिहिलंय, "अगदी लहानपणापासून या मंदिरात आम्ही येतोय, दादरला राहत असताना माझी आई आणि दिपा दर मंगळवारी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जायच्या, दिपा दर महिन्याला मंदिरामध्ये पहिल्या मजल्यावर २१ रुपयांची पूजा करायची, तशी पूजा आज मंदिरात होते की नाही माहित नाही.पण असं सुंदर दर्शन आजपर्यंत कधीच झालं नाही. आपल्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये एक वेगळीच ऊर्जा energy आहे,
जी मला काल प्रकर्षाने जाणवली , आपल्याकडे खूप कमी मंदिरांमध्ये अशी दैवी ऊर्जा जाणवते. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया...", अशी सुंदर पोस्ट मिलींद गवळी यांनी लिहिली आहे.

Web Title: marathi actor zhapuk zhupuk fame milind gawali shared his experience of visiting siddhivinayak temple video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.